महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेणार आहेत हे निश्चित झालं आहे कारण विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या आमदारांनी एकमुखाने निवड केली आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे संकेत निश्चित होतेच. त्या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे नाव त्यात असेल का? यावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला

महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असेल हे अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. यात एकनाथ शिंदे यांचं नाव असेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी याविषयी माध्यमांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन आणि संघटना वाढवेन असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. मात्र आम्हा सगळ्या आमदारांची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात जावं अशी आमची इच्छा आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह राज्याच्या हितासाठी आहे. मंगळवारी आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसंच देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. शिवसेनेचे जेवढे आमदार आणि खासदार आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं बलाबल कसं आहे?

महायुतीला २३७ जागा
मविआ-४९ जागा
अपक्ष आणि इतर-२ जागा

महाराष्ट्रात महायुतीत कुणाला किती जागा आहेत?

भाजपा १३२ आमदार विजयी
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ जागा विजयी

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री! भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड, भाषणात म्हणाले…

असं बलाबल महायुतीत आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक पार पडण्याआधी मुख्यमंत्री कोण होईल असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नव्हता. दरम्यान महायुतीला महाप्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? यावर बराच खल झाला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं जावं यासाठी आग्रही होते. मात्र ठाण्यातल्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलं. दरम्यान ४ डिसेंबर म्हणजेच आज देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे निश्चित झालं आहे मात्र उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde will be the deputy cm in maharashtra government uday samant gave this answer scj