शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी झाली. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. निवडणूक आयोगाने यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितलं असून पुढची तारीख दिली आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी आता ३० जानेवारीला होणार आहे. दरम्यान एकीकडे निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राज्यभरातील विविध राजकीय नेते मंडळींच्या यावर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. शिंदे गटाचे नेते रामदास कदम आज शिर्डीत होते, त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो काही निकाल लागेल, मी जो काय थोडाफार अभ्यास केला आहे. याअगोदरचे आपण सगळे दाखवले जर पाहीले, अगदी इंदिरा गांधींपासून, गाय-बछड्यापासून, बैलजोडीपासून, सायकलपासून तर आमदार खासदार अधिक कोणाकडे आहेत? त्यांच्याबाजूने आतापर्यंत निकाल लागलेले आहेत. मला विश्वास आहे की निवडणूक आयोगदेखील एकनाथ शिंदेंकडे ५० आमदार आहेत, उद्धव ठाकरेंकडे केवळ १२-१३ आमदार शिल्लक आहेत. एकनाथ शिंदेंकडे १३ खासदार आहेत, उद्धव ठाकरेंकडे केवळ पाच खासदार शिल्लक राहिले आहेत. म्हणून मागील दाखल्यांचा जर आपण अभ्यास केला, तर धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळायला एकनाथ शिंदेंना कुठलीही अडचण येणार नाही, असं मला निश्चितपणे वाटतं.”
या अगोदर रामदास कदम यांनी “करोना काळात मोठा खंड पडला होता. ५२ वर्षांपासून मी सातत्य ठेवलं होतं, केवळ मध्ये दोन-अडीच वर्षांचा खंड पडला होता. आज पुन्हा एकदा साईबाबांच्या चरणी आलो आहे आणि त्यांना साकडं घातलय, की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे, यांच्या हातून संबंध महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होऊ दे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि यांना अभिप्रेत असलेलं काम हे त्यांच्या हातून घडो अशी प्रार्थना मी आज साई चरणी केली.” अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली.