Sanjay Shirsat on Eknath Shinde : सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. दिल्ली येथील बैठकीनंतर आज मुंबईत महायुतीची पुढील बैठक होणार होती. मात्र ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. या वेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ मी विश्रांतीसाठी आलो आहे, नंतर बोलतो असे सांगून संवाद टाळला. नेहमी गावी आल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधणारे शिंदे आज काही न बोलल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड व बैठका सोडून शिंदे आज दोन दिवसांसाठी गावी पोचले आहेत. त्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या बैठका आता दोन दिवस होणार नाहीत. याबाबत संजय शिरसाट म्हणाले, “राजकीय पेचप्रसंग आला, विचारासाठी वेळ हवा असेल तर ते त्यांच्या गावाला प्राधान्य देतात. ते दरे गावात जातात, तिथे त्यांचा फोन वगैरे लागत नाही.”
ते नक्कीच मोठा निर्णय घेतील
“आरामात, विचार करून मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरे गावात जातात. उद्या (३० नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत मोठा निर्णय नक्कीच घेतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हालचालींबाबत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: Shiv Sena leader Sanjay Shirsat says, "Whenever Eknath Shinde thinks that he needs some time to think he goes to his native village…When he (Eknath Shinde) has to make a big decision he goes to his native village. By tomorrow… pic.twitter.com/cEb5akzWrM
— ANI (@ANI) November 29, 2024
दरम्यान, एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री पद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यावर संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदेंना दिल्लीत रस नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फार रस आहे.
पत्रकारांशी संवाद टाळला
दिल्लीतील बैठकीनंतर आजपासून होणाऱ्या बैठकांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होणार होते. दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे विविध प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यावर भाजपाने पर्याय दिला आहे. शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचाली होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली. मात्र गावी पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी काहीही संवाद केला नाही. या वेळी पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.