Eknath Shinde Deputy CM: महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही अद्याप सत्तास्थापनेला मुहूर्त लाभलेला नाही. मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्यामुळे सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल दिल्लीत म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी दोन पावले मागे येऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे किंवा केंद्रात मंत्रीपद घ्यावे. यावरूनही शिवसेनेतून (शिंदे) विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केले असून शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचा प्रचंड विजय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढून महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सत्तास्थापनेच्या वादावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंमुळे महायुतीला प्रचंड असा विजय मिळाला. त्यामुळे तेच मुख्यमंत्रीपदावर राहिले पाहीजेत, अशी आमची मागणी आहे. पण जर त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जात असेल तर ते स्वीकारणार नाहीत.”
जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविले तर त्याचा योग्य संदेश राज्यात जाईल आणि आगामी स्थानिक स्वराज संस्था, महानगरपालिकाच्या निवडणुकीत त्याचा खूप फायदा होईल, असेही शिरसाट म्हणाले. तसेच पुढे जाऊन उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारण्याबद्दलचे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही ते म्हणाले.
रामदास आठवलेंनी केला होता उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख
दिल्लीत संसदेच्या आवारात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले होते. त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. हा आकडा खूपच चांगला आहे. पण भाजपाचे १३२ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपा पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसेच भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे.”
“एकनाथ शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावे किंवा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे नसेल तर त्यांनी केंद्रात येऊन मंत्रीपद घ्यावे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह नक्कीच त्यांचा विचार करतील. पण त्यांनी नाराजी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहीजे”, असेही रामदास आठवले म्हणाले.