सोलापूर : शेतात घुसून पिकांची नासाडी करणाऱ्या प्राण्यांच्या बंदोबस्तसाठी बांधावर सोडलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून एका वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे घडलेल्या या घटनेला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून मृत शेतकऱ्याच्या भावाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ निवृत्ती ढोणे (वय ६६, रा. आगळगाव रोड, बार्शी) असे या दुर्घटनेतील मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी शोभा ढोणे यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत रघुनाथ यांचे वयोवृद्ध बंधू बाबाराव निवृत्ती ढोणे (वय ७६) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

बाबाराव ढोणे यांची धामणगाव शिवारात शेतजमीन आहे. त्यांच्या शेतात धाकटे बंधू रघुनाथ ढोणे हे पत्नी शोभा हिच्यासह आले होते. रात्री शेतात पिकांचे नुकसान करण्यासाठी रानटी डुक्कर किंवा अन्य वन्यप्राणी येऊ नये आणि त्यांच्याकडून पिकांची नासाडी होऊ नये म्हणून बाबाराव ढोणे यांनी शेताच्या बांधावर सभोवताली लाकडी खुंट्यांना लोखंडी तार बांधून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. अशाप्रकारे विद्युत प्रवाह सोडणे धोकादायक असून, कोणत्याही मनुष्य प्राण्याला जिवाला मुकावे लागते, याची जाणीव असतानाही बाबाराव ढोणे यांनी रात्री शेतात बांधावर विद्युत प्रवाह सोडला होता. रघुनाथ ढोणे हे सहजपणे बांधावर गेले असता विद्युत प्रवाहाचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी घटना

अक्कलकोटमध्ये मैंदर्गी रस्त्यावर एका इमारतीवर काम करताना विद्युत धक्का बसून एका खासगी वीजतंत्रीचा जागीच मृत्यू झाला. अमोल सुरेश जाधव (वय २८, रा. मिरजगी, ता. अक्कलकोट) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वीजतंत्रीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अक्कलकोट उत्तर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.