सोलापूर : वृद्ध शेतकऱ्याने आयुष्याच्या संध्याकाळी मुलांवर शेतीची जबाबदारी सोपवत संपूर्ण शेती मुलांच्या नावावर केली. परंतु, नंतर मुलांनी वृद्ध पित्याच्या पालनपोषण करण्याचे कर्तव्य विसरून त्याला अडगळीत टाकले. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या पित्याने बेजबाबदार मुलांच्या नावे केलेली शेतजमीन पुन्हा आपल्या नावावर होण्यासाठी प्रशासनाकडे हेलपाटे घातले. परंतु, त्यातून न्याय मिळत नसल्याने निराश झालेल्या त्या दुर्दैवी पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. सोपान राऊत नावाच्या एका शेतकऱ्याची ही व्यथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कानावर गेली असून, त्यांनी त्याची गंभीर दखल घेत राऊत यांच्या तक्रारीवरून त्यांच्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सोपान राऊत यांनी शेती कसणे जमत नसल्याने आपली शेतजमीन मुलांकडे सोपविली होती. यात पिता म्हणून त्यांची अपेक्षा एवढीच होती की, मुलांनी शेती करताना स्वत:चा संसार चालवावा आणि आपलेही पालनपोषण करावे. परंतु, मुलांनी शेतजमीन ताब्यात आल्यानंतर पित्याविषयीचे कर्तव्य विसरत त्याला अडगळीत टाकले. त्यामुळे उपेक्षा होत असताना सोपान राऊत यांचा मुलांवरील विश्वास गमावला.

मुलांना शेतजमीन दिल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. त्यातूनच त्यांनी मुलांना दिलेल्या जमिनीचा ताबा पुन्हा स्वतःकडे मिळण्यासाठी प्रशासनाकडे हेलपाटे सुरू केले. प्रशासकीय यंत्रणेचे दरवाजे वारंवार झिजवूनही प्रशासन असंवेदनशील असल्याने न्याय मिळत नव्हता. त्यामुळे पूर्ण निराश झालेल्या राऊत सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

परंतु, तेथेही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट होत नव्हती. त्यातूनच त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कीटकनाशक प्राशन केले. तोंडातून फेस येऊ लागल्याने आणि ते ओरडू लागल्याने त्याकडे इतरांचे लक्ष गेले. नंतर धावपळ सुरू झाली. त्यांना नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांनी तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही बाब जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कानावर जाताच त्यांनी राऊत यांच्या तक्रारीची चौकशी करून त्यांच्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सोपान राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

Story img Loader