राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या जाण्याने लोकनेतृत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी बाळू धानोकरांच्या कार्याचा गौरवही केला. टीव्ही ९ मराठीशी बोलताना ते बाळू धानोरकरांच्या आठवणीत भावूक झाले होते.
“युवा नेतृत्त्व, चंद्रपूर जिल्ह्याचा ध्यास असलेलं नेतृत्त्व, बहुजन नेतृत्त्व असल्याने खऱ्या अर्थाने ही दुःखद घटना आहे. ही घटना फार असह्य आहे. कमी वयात मृत्यू होणं हे आमच्यासाठी सर्वांना दुःखाची घटना आहे”, अशा भावना नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.
“बाळू धानोरकर हे जनसामान्यांचे प्रश्न घेऊन पोटतिडकीने लढणारा नेता होता. जिवाची बाजी लावणारा नेता होता. एखादं काम हातात घेतलं तर त्याला न्याय मिळवून देणं हाच उद्देश होता. ते लोकप्रिय नेते होते. एका वेगळ्या लाटेत निवडून येणं, म्हणजे त्यांच्याबद्दल लोकप्रियतेची जाणीव होते. या घटनेमुळे धक्का लागलेला आहे. या धक्क्यातून बाहेर येणं अडचणीचा भाग आहे. लोकनेतृत्त्व हरपल्याने मनापासून वेदना होत आहेत”, असंही नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
बाळू धानोरकर यांचं निधन
बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय ४७ होते.
वडिलांचंही चार दिवसांपूर्वी निधन
खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाही. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचंही निधन झालं. पिता-पुत्र्याच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर पसरले आहे.