रत्नागिरी नगर परिषदेच्या चार जागांसाठी आज (१ नोव्हेंबर) होत असलेल्या पोटनिवडणुका माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या पक्षाच्या तिकिटावर पुन्हा निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या त्यांच्या चार समर्थक नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून सेनेच्या उमेदवाराला मतदान केले. म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश शेटय़े यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या सुनावणीमध्ये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे त्या चार जागांसाठी या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुका जाहीर होताच माजी नगराध्यक्ष शेटय़े सेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्या पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर त्यांची सून कौसल्या शेटय़े यांनाही दुसऱ्या जागेवर उभे केले आहे. त्यामुळे त्यांच्या पसंतीने देण्यात आलेल्या सेनेच्या उमेदवारांमागे आमदारांनी ताकद उभी केली आहे.
या पोटनिवडणुकांसाठी गेले सुमारे पंधरा दिवस झालेला प्रचार म्हणजे केवळ व्यक्तिगत चिखलफेक होती आणि शेटय़े व सामंत त्यात केंद्रस्थानी होते. अगदी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रचारसभाही त्याला उपवाद ठरल्या नाहीत.
भाजप, सेना आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार या पोटनिवडणुकांच्या रिंगणात असले तरी मुख्य लढाई सेना व राष्ट्रवादीमध्येच असून भाजपचा सहभाग फक्त सेनेला अपशकुन करण्यासाठी आहे. मागील निवडणुकीत चारही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या कायम राखणे अवघड असले तरी शेटय़े यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेता या निवडणुका त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत, हे निश्चित.

Story img Loader