स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गीता वाचलेली नाही. सर्वाना प्रेमाने बरोबर घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी कधी उघडून बघितला नाही. जे नेते भ्रष्टाचारावर बोलतात, त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री जेलमध्ये गेल्यावर तो प्रश्न जाणवत नाही. लोकपालसह भ्रष्टाचारविरोधातील ६ विधेयकांना राहुल गांधींची विधेयके म्हणून भाजपने बाजूला केले. त्यांनीच विरोध केला. ते बंदिस्त मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात, अशी जाहीर टीका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केली. एक व्यक्ती देश चालवत नसतो, अशी टीका करताना राहुल यांच्या भाषणात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव मात्र नव्हते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेसची राज्यातील प्रचाराची पहिली सभा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘भाजपलाही प्रेमानेच पाठवू’
देशात काँग्रेस मुक्तीचा नारा दिला जात आहे, मात्र ज्यांनी हा नारा दिला त्यांनी देशाचा इतिहास वाचलेला नाही. सर्वाना सामावून घेऊन प्रेमाने वागविणारा हा पक्ष आहे. अगदी ब्रिटिशांनासुद्धा भारतातून हाकलून लावताना प्रेमानेच वागवले गेले. भाजपलाही तसेच प्रेमाने परत पाठवू, असे सांगत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, की पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य माणसाचे अधिकार वाढविण्याचे राजकारण करीत आहोत. दुसरीकडे भाजप मात्र एकाच व्यक्तीच्या हाती शक्ती जावी, अशी कार्यप्रणाली राबवत आहे. आम्ही विकेंद्रित पद्धत मानतो आणि ते बंदिस्त मानसिकतेत आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) काळात जेवढे रस्ते बनविले गेले, त्यापेक्षा तीनपट अधिक रस्ते संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या कालखंडात बनविले गेले, असा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचारावर केवळ बोलले जाते. कर्नाटकचे मुख्यमंत्री जेलमध्ये गेले आणि गुजरातच्या कॅबिनेटमध्ये तीन मंत्री भ्रष्ट आहेत. लोकपाल विधेयकाला भाजपने विरोध केला. हे विधेयक त्यांनीच अडवून धरले. भ्रष्टाचाराच्या लढाईत ६ विधेयके मांडली. मात्र, ती राहुल गांधींची आहेत म्हणून त्यांना विरोध झाला. जो विकास ६० वर्षांत झाला, तो ३ महिन्यांत करू, असे सांगितले जात आहे. जनतेचे अधिकार काँग्रेस वाढवत आहे. मात्र, ते नाकारून भाजप आघाडी जनतेशीच प्रतारणा करीत आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचा किल्ला शाबूत ठेवला जाईल. काँग्रेसच्या विचाराला धोका पोहोचणार नाही, असेच काम या निवडणुकीत होईल, असे या वेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व प्रभारी मोहन प्रकाश यांचीही भाषणे झाली.
महाराष्ट्राची मार्केटिंगमध्ये पिछाडी
अन्य राज्यांच्या तुलनेत विकासात महाराष्ट्राचा क्रमांक बराच वरचा आहे. राज्याचा वाटा १७ टक्के आहे. ‘एफडीआय’मध्ये सर्वाधिक गुंतवणूक राज्यात झाली. उद्योगातही महाराष्ट्रच पुढे आहे. राज्याचे नेते काम अधिक करतात, पण त्याचे मार्केटिंग करीत नाहीत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (डीएमआयसी), तसेच दिल्ली-चेन्नई व दिल्ली-कोलकाता या औद्योगिक पट्टय़ात (इंडिस्ट्रयल कॉरिडोर) रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध होणार आहेत. जो वर्ग आता दारिद्रय़रेषेच्या वर आला, तो भविष्यात मध्यमवर्गीयांमध्ये आणणे हे उद्दिष्ट आहे. डीएमआयसीमुळे १३ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल व चीनपेक्षाही अधिक वेगाने आपली उत्पादकता वाढेल, असेही राहुल गांधी म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
नेता फक्त भाषणासाठीच असतो, असे आपल्या देशातील वातावरण झाले असल्याचे राहुल गांधी सांगत होते. नेत्यांनी ऐकून घ्यायचे असते. अहंकार, इगो बाजूला ठेवायचे असतात. गरीब व महिलांचे ऐकून घ्यायचे असेल तर थोडे वाकावे लागते, असे राहुल सांगत होते, त्याच वेळी सभेत समोरच्या बाजूला बसलेल्या काही तरुणांनी ‘मराठा आरक्षण मिळावे’ यासाठी घोषणाबाजी केली. काहींनी बॅनरही दाखविले. त्यांची घोषणाबाजी एवढी होती, की भाषण सुरू असताना राहुल यांनाही म्हणावे लागले, ‘त्या मुद्दय़ाकडे मी येतो आहे.’ नंतर पोलीस व काँग्रेस कार्यकर्ते घोषणा देणाऱ्यांच्या दिशेने जाऊ लागले. त्यामुळे घोषणा देणारेही नंतर शांत झाले.