निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना शिवसेना या नावाचाही वापर करता येणार नाही. दोन्ही गटांना दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे समर्थकांसोबत राहणार का? असा प्रश्न विचारला जातोय. यावर काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आम्हाला उद्धव ठाकरे यांचे मत जाणून घ्यावे लागेल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पुढील रणनीती काय? भरत गोगावले यांनी दिली माहिती, म्हणाले…
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आम्हाला सर्व पक्षांना संपवायचे आहे, असे सांगितले होते. ते वाक्य खरे ठरलेले आहे. दिल्लीमध्ये जे ठरलेलं होतं तेच झालं. राज्यपातळीवर पक्ष संपवणे तसेच लोकशाहीचा खून करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. सध्या सुरु असलेले खालच्या पातळीवरचे राजकारण भारतीय लोकशाहीला न परवडणारे आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा >>> धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? बड्या नेत्याने दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत असेल का याबाबत विचारले असता त्यांनी आमच्यात मतभेत नाहीत. आम्ही आमच्या प्रभारींकडे हा प्रश्न मांडला होता, असे नाना पटोले यांनी सांगितले. “आता समीकरणं बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांचे मत काय आहे? हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. भाजपाने जी खेळी खेळली आहे, त्यावर मात करण्यासाठी आम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.