अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल(सोमवार) निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज(मंगळवार) नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले होते.

हेही वाचा : ‘ढाल-तलवार’ निशाणी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संबंधित चिन्हांचा अर्थ सांगताना भरत गोगावले म्हणाले होते की, जनतेचं रक्षण करण्यासाठी ढाल आहे, तर शत्रू अंगावर आला तर त्यांच्यासाठी तलवार आहे. ‘सूर्य’ उगवल्याशिवाय आपला दिवस चांगला जाऊ शकत नाही, त्यासाठी ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह सादर केलं आहे. तर ‘पिंपळ’ हे पवित्र झाड आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही. आम्हाला जे चिन्ह मिळेल ते घ्यायला आम्ही तयार आहोत.

शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली होती. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी, दुपारी एक वाजेपर्यंत पक्ष व चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही गटांकडून सादर झालेल्या नाव आणि चिन्हांमध्ये साधम्र्य असल्याचेही उघड झाले. त्यामुळे आयोगाकडून कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे लक्ष लागले होते. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर, शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला.