राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला होता. अशाचप्रकारचा दावा आता अजित पवार गटाने केला आहे. पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा करत अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाने आपलाच मूळ पक्ष असल्याचे सांगत पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला आहे.

अजित पवारांना अध्यक्ष करा, सदस्यांचा ठराव निवडणूक आयोगाला प्राप्त

एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२३ तारीख असलेले पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. यामध्ये १९६८ च्या पॅरा १५ अंतर्गत एक याचिका प्राप्त झाली आहे. ३० खासदार आमदार आणि एमएलसी यांची ४० प्रतिज्ञापत्रे या याचिकेतून करण्यात आली आहेत. तसंच, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठरावही निवडणूक आयोगाला प्राप्त झाला आहे.

जयंत पाटलांचंही कॅव्हेट

दरम्यान, अजित पवारांसह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. “महाराष्ट्र विधानसभेच्या नऊ सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची कार्यवाही करावी”, अशी मागणी करणारे कॅव्हेट जयंत पाटील यांनी ४ जुलै रोजी निवडणूक आयोगाला पाठवले होते. हे पत्रही निवडणूक आयोगाला मिळाले आहे.

दोन्ही गटाकडून आज शक्तीप्रदर्शन

आज, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आज मुंबईत मोठ्याप्रमाणात शक्तप्रदर्शन करण्यात आले. अजित पवार गटाकडून वांद्रे येथे बैठक घेण्यात आली होती, तर शरद पवार गटाकडून यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक घेण्यात आली होती. अजित पवारांनी यावेळी शरद पवारांच्या वयाचा, निवृत्तीचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission of india has received a petition from ajit pawar staking claim to nationalist congress party and party symbol sgk