राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता. शरद पवार गटाने केलेल्या याचिकेची दखल घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला नोटीस पाठवली होती. आता अशीच नोटीस अजित पवार गटाच्या याचिकेची दखल घेत शरद पवार गटाला पाठवण्यात आली आहे. येत्या तीन आठवड्यांत पक्षांसदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दि हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तसंच, दोन्ही गटांनी एकमेकांना ही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दि हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याने ही नोटीस आली असल्याचे मान्य केले आहे. “अजित पवार गटाने विधानसभेतील सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे, त्यावर उत्तर सादर करण्याबाबत नोटीस निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे. त्यांच्या दाव्यावर उत्तर देण्याचे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ही एक प्रक्रिया आहे. आम्हीही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील याचिका केली होती तेव्हा अजित पवार गटालाही निवडणूक आयोगाने अशी नोटीस पाठवली होती”, असं या वरिष्ठ नेत्याने सांगितलं.
हेही वाचा >> “माझ्या तिसऱ्या कार्यकाळात…”, मोदींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या खासदाराची खोचक टीका; म्हणाले, “घराणेशाहीच्या…”
“शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आलेल्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाला आमचे उत्तर हवे आहे. आम्ही विहित कालावधित आमचं उत्तर निवडणूक आयोगाला देऊ”, असंही या वरिष्ठ नेत्याने सांगितलं.
अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष?
राज्याच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार यांनी २ जुलै रोजी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अनेक आमदार असून त्यापैकी आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, ३० जून रोजी लिहिलेले एक पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. या पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा ठराव आणि ४० नेत्यांची शपथपत्रेही यावेळी सादर करण्यात आली होती.
शरद पवार गटाने पाठवली होती अपात्रतेची नोटीस
दरम्यान, २ जुलै रोजी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लागलीच ३ जुलै रोजी शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली होती. त्यानुसार, अजित पवारांसह आठ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्बात अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आलं होतं. तर, निवडणूक आयोगाने आधी शरद पवार गटाची सुनावणी घ्यावी, असे कॅव्हेट जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाची काव्यमय टीका; म्हणाले, “वजीर देतो शिव्या…”
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा?
अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यातील पक्षांतर्गत वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचल्याने राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निर्णय होणार आहे. याकरता पक्षासंदर्भातील कागदपत्रे, शपथपत्र वगैरे दोन्ही गटांना सादर करावी लागणार आहेत.