निवडणूक कर्मचाऱ्यांनाही उधारीवर काम करण्याची वेळ आल्याचे आज इन्सुली जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या नियोजनावरून उघड झाले. निवडणूक विभागाने पाच लाख रुपये खर्चाचे बजेट दिले, पण राज्य निवडणूक आयोगाने एक लाख रुपये मंजूर केल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आज ५१.६५ टक्के एवढे कमालीचे अल्प मतदान झाले. या निवडणुकीत १२ हजार ७९० मतदारांपैकी सहा हजार ६०६ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारांत कमालीची निराशा उघड झाली.
या पोटनिवडणुकीसाठी कर्मचारी नेमण्यात आले. त्यांचा भत्ता, जेवणखर्चापोटी पाच लाख रुपयांचे बजेट पाठविण्यात आले होते. पण प्रत्यक्षात एक लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवडणूक काटकसरीची ठरली. त्यांचे जेवण, चहा-पाण्याच्या खर्चावरही काटकसर करावी लागल्याने कर्मचारी नाराज आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या कर्मचारी वर्गाच्या खर्चापोटी सुमारे १० लाख रुपये एकटय़ा सावंतवाडी तालुक्याला मिळणे बाकी आहेत. त्यामुळे निवडणूक कामही ‘आज उधार, उद्या पैसे’ अशा पद्धतीनेच चालू झाल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकांना खर्चाची तरतूद करण्यात येत असते. पण गेल्या काही वर्षांत निवडणूक खर्च पुरेसा मिळत नसल्याने चहा, पाणी, नाश्ता देण्यात येत नाही, ही काटकसर करीत निवडणूक काम करावे लागते, असे बोलले जात आहे.
निवडणुका कमी खर्चात कराव्या लागत असल्याने कर्मचारी नाराज आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा