दापोली नगरपंचायतीत ‘त्रिशंकू’ स्थिती निर्माण झाल्याने सत्तास्थापनेबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातच सर्व पक्षांच्या नजरा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाकडे लागल्याने बहुमताचा मार्ग आणखी बिकट झाला आहे.

या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भाजप किंवा काँग्रेसशी हातमिळवणी  अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजपचा पाठबा याचा निर्णय नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीच्यावेळीच जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुळात दापोली नगरपंचायतीत शिवसेनेचे सात आणि भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. आघाडीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे  प्रत्येकी चार असे एकूण आठ नगरसेवक आहेत.

केंद्र आणि राज्यातील सत्तेत युती असली तरी दापोलीत भाजपचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू म्हणून आतापर्यंत शिवसेनेकडे पाहिले जात होते. या दोन्ही पक्षांनी दापोली नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवून त्याचाच प्रत्यय दिला. मात्र त्याचा फायदा काँग्रेस आघाडीला उचलता आला नाही. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपशी सन्मानपूर्वक सलगी करण्याचे संकेत दिले.

या घडामोडीत सत्तेत मुख्य पदांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीच्या राजकीय धोरणाबाबत आक्षेप घेतला आणि प्रसंगी स्वतंत्र निर्णय घेण्याचे सूचित केले. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या शिडात चांगलीच हवा भरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिस्थितीत शिवसेनेला प्रसंगी भाजपप्रमाणेच काँग्रेसचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपकडून आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचा अंदाजही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीपर्यंत सर्व पक्षांची भूमिका गुलदस्त्यात राहणार असून नगराध्यक्ष आणि उपनराध्यक्ष पदाच्या रिंगणात चारही पक्षांचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतरच सत्तास्थापनेसाठी कोणत्या पक्षांची हातमिळवणी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल.