२२ लाख १ हजार ३२६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी जिल्ह्यातील २ हजार ६९३ मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी व साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण २२ लाख १ हजार ३२६ मतदार नोंदणी झालेली असून हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पुनरीक्षण कार्यक्रमात ४५ हजार ७८७ मतदारांची वाढ झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात १० लाख ९८ हजार ७२७ पुरुष मतदार, तर १० लाख ५५ हजार ६४१ महिला मतदार तर ४ इतर मतदारांचा समावेश होता. त्यानंतर राबविण्यात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाअंतर्गत नवीन नाव नोंदणी, नाव वगळणी, पत्ता बदल आदींचे पुनरीक्षण करण्यात आले. तदनंतर  ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. यानुसार रायगड जिल्ह्यात ११ लाख १९ हजार ७४३ पुरुष मतदार, १० लाख ८० हजार ५१३ महिला मतदार व अन्य ३ मतदार असे एकूण २२ लाख २५९ मतदार नोंदविण्यात आले. तसेच  १ हजार ५७ सíव्हस मतदार आणि १०  एनआरआय मतदारांची नोंदणी झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या २२ लाख १ हजार ३२६ एवढी झाली आहे.

गेल्या वेळच्या यादीनुसार या पुनरीक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात २१ हजार १६ पुरुष मतदार व २४ हजार ८७२ स्त्री मतदारांची वाढ झालेली असून १ तृतीयपंथी मतदार यांची वगळणी झालेली आहे. अशी एकूण ४५ हजार ८८७ मतदारांची वाढ झाली आहे. या अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात मतदार यादी फोटो असलेले एकूण २० लाख ९६ हजार ५९९ मतदार असून त्याची टक्केवारी ९५.२९% आहे.

तसेच मतदार ओळखपत्र असलेले एकूण २१ लाख १३ हजार ६२३ मतदार असून त्याची टक्केवारी ९६.०६% आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण हे हजार पुरुष मतदारांमागे ९६५ एवढे आहे. निरंतर मतदार नोंदणी सुरू आहे. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. निवडणूक नामनिर्देशन  दाखल होईपर्यंत ज्या ज्या मतदारांची नावे नोंदविली जातील त्यांची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी व मतदार यादी अचूक व शुध्दीकरण करण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे असे आवाहन, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Story img Loader