लातूर लोकसभेचा उमेदवार ठरविताना १३ मार्चला घेतल्या जाणाऱ्या बैठकीत प्रत्येक उमेदवाराला ८ मिनिटे बोलण्याची संधी दिली जाईल व नंतर खुले मतदान होईल. ८ मिनिटांच्या या तयारीसाठी सर्व जण कामाला लागले आहेत. लातूरचा उमेदवार निवडीच्या नव्या प्रयोगावरही मुद्दलात घाटा कशासाठी, असा सवाल केला जात आहे.
काँग्रेसने औरंगाबाद व यवतमाळ या दोन मतदारसंघांत लोकांमधून उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतला होता. कुठे माशी िशकली, हे कार्यकर्त्यांना कळले नाही. अचानक लातूर व वर्धा या दोन मतदारसंघात उमेदवार निवडीचा नवा प्रयोग लादण्यात आला. २००९ मध्ये लातूर मतदारसंघ राखीव झाला. विलासराव देशमुख यांनी जयवंत आवळे या कोल्हापूरच्या पैलवानास लातूरच्या तालमीत उतरवून फड जिंकून दाखवला. आता विलासराव नाहीत. त्यामुळे लातूरचा फड जिंकवून दाखवण्याची ताकद शिवराज पाटील चाकूरकर समर्थकांची आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव हे कसे योग्य उमेदवार आहेत, हे चाकूरकर समर्थक सांगू लागले होते.
लातूर जि.प.चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भा. ई. नागराळे हेही फासे टाकून होते. विद्यमान खासदार आवळे आपली डाळ पुन्हा शिजेल का, याचा अंदाज घेत होते. सध्या मतदारयाद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. डॉ. जाधव लातूर मतदारसंघातील काँग्रेसअंतर्गत सर्व गट-तटांना स्वत: भेटत आहेत. त्यांची जिल्हय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी फारशी ओळख नसल्यामुळे त्यांना मतदान कोण देणार? त्यापेक्षा जिल्हय़ातील स्थानिक उमेदवारांना पसंती अधिक मिळू शकते. अर्थात, येथील प्रस्थापित मंडळी कोणाच्या पाठीशी उभी राहतात, यावर त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.