रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांचे अपेक्षित ध्रुवीकरण झाले आहे का, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे.यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी धार्मिक ध्रुवीकरणावर विशेष भर दिल्याचे दिसून आले आहे. हा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. मतदारसंघातील सहा विधानसभा सदस्यांपैकी चार महायुतीचे, तर दोन महाविकास आघाडीचे सदस्य आहेत.
हेही वाचा >>> बोगस ॲकॅडमींच्या चौकशीचे शिक्षणमंत्री केसरकरांचे आदेश
पण महायुतीचे कागदावरील हे बळ खरोखर पूर्ण ताकदीने वापरले गेले आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताकद असली तरी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघाने त्यांना किती हात दिला असेल, याबाबत उलट सुलट चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर राणे येथील पालकमंत्री उदय सामंत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. पण या दोन मतदारसंघांमधून त्यांना किती आघाडी मिळेल, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोनच आमदार या मतदारसंघात असले तरी कुडाळच्या वैभव नाईक यांनी, अस्तित्वाची लढाई आणि राणेंशी राजकीय वैरामुळे सर्व ताकद पणाला लावली, असे मानले जाते. राजापूरचे या गटाचे आमदार राजन साळवी यांच्याबरोबरच विधानसभेसाठी इच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड यांनीही जोर लावल्यामुळे तेथून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे मावळते खासदार विनायक राऊत यांना मतांच्या आघाडीची आशा आहे. तसे असले तरी कोकणच्या राजकारणातील मुरब्बी राणे यांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात शत्रू पक्षाची मते खेचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लोकसभा मतदारसंघातील मुस्लीम, ख्रिाश्चन आणि दलित मतदारांनी कशा प्रकारे मतदान केले आहे, यावरही येथील निर्णय अवलंबून आहे. नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव नीलेश यांचा राऊत यांनी गेल्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पराभव केला आहे. या पराभवाचे राणे उट्टे काढतात, की राऊत विजयाची हॅट्ट्रिक करतात, याबाबतही उत्सुकता आहे.