पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल हा मोदी सरकारला इशारा असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यासोबत जर मोदी सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत तर जनता 2019 लोकसभा निवडणुकीतही भाजपाला धडा शिकवेल असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.

मोदी सरकारला जनतेने इशारा दिला असून सरकारने दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत असं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. निकालातून जनतेने मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड पाडला असल्याचंही ते म्हणाले आहेत. सत्तेवर येताना सरकारने अनेक आश्वासनं दिली असून ती प्रत्यक्षात आली नाहीत. कोणती आश्वासनं दिली हे आता सरकारही विसरले आहे असा टोला यावेळी अण्णा हजारे यांनी लगावला.

यावेळी त्यांनी राम मंदिर आणि नामांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. निवडणुकीत राम मंदिर आणि नामांतराचा मुद्दा चालला नसून, लोकांनाही ते आवडलेलं नाही असं अण्णा हजारे यांनी म्हटलं. पुतळे आणि मुर्तीची उंची वाढवण्यापेक्षा विचारांची उंची वाढवणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Story img Loader