एमआयएम, तसेच काही कट्टर हिंदुत्ववादी संघटना समाजात विद्वेषाचे वातावरण पसरवत आहेत. जेव्हा जेव्हा समाजात जातीयता व धर्माधतेचे विष पसरते, तेव्हा तेव्हा दंगली घडतात आणि या दंगलीत सर्वसामान्य माणसे बळी जातात. अशा वेळी नरेंद्र मोदी हे देशाला पंतप्रधान म्हणून परवडणारे नाहीत, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पाथरीतील शेतकरी मेळाव्यात केली.
राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार विजय भांबळे, जि.प. अध्यक्षा मीना बुधवंत, महापौर प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार, सारंगधर महाराज, नगराध्यक्ष कलीम अन्सारी, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, चक्रधर उगले, राजेश विटेकर, जुनेद दुर्राणी, व्यंकटराव कदम आदी उपस्थित होते.
राज्यात सिंचनावर ४० हजार कोटी रुपये खर्च झाले. पैकी १० हजार कोटी पुनर्वसन व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च झाले. सिंचनावर ३० हजार कोटी खर्च झाला असताना विरोधक ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपचे गणित कच्चे असल्याची टीका पाटील यांनी केली. टोलमाफीवर बोलताना त्यांनी ‘या पापाचा बाप कोण,’ असा खोचक सवाल उपस्थित शेतकऱ्यांना केला.
गुजरातच्या विकासाचा दावा फसवा असून गोपीनाथ मुंडे सतत भूलथापा देणारी वक्तव्ये करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेने ‘घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ’ अशा घोषणा देत मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध केला. नामांतर लढय़ात काही लोक शहीद झाले, अनेकांना लाठय़ा-काठय़ा खाव्या लागल्या. या नामांतरवाद्यांचे दुख विसरून आठवले यांनी शिवसेनेशी घरोबा केला. त्यामुळे त्यांनी नामांतरवाद्यांना उत्तर दिले पाहिजे, असे मतही व्यक्त केले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन तातडीने आर्थिक मदत दिली जाईल, असेही पाटील म्हणाले.
गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुगदल कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे पाथरी तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे, असे बाबाजानी यांनी प्रास्ताविकात सांगितले. फौजिया खान, वरपुडकर, भांबळे, सारंगधर महाराज आदींची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा