धर्मनिरपेक्ष शक्तीला बळ देण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हेवेदावे सोडून एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीत काम करावे लागणार आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा आपापसात भांडत बसल्यास त्याचे वेगळे परिणाम होऊन त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला, तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी केवळ डॉ. मनमोहनसिंग सरकारच सक्षम तथा समर्थ असल्याचा दावा केला.
पंढरपुरातील दाते मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी सोलापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा मेळावा पवार व शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना केल्या. सोलापूर राखीव मतदारसंघाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे व माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यापूर्वी पवार, शिंदे व मोहिते-पाटील यांनी विठ्ठल मंदिरास भेट देऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. या मेळाव्यास दोन्ही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर राहिल्याने संपूर्ण मंगल कार्यालयाची जागा कमी पडल्याचे दिसून आले.
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकांचा काळ असला तरी शेतकऱ्यांवरील गारपिटीसह अवकाळी पावसाच्या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच आपण मुख्यमंत्र्यांनादेखील सूचना केल्या आहेत. राज्य शासनाने आठवडाभरात राज्यातील नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवून द्यावा. केंद्रातील या विषयावरील समितीचे अध्यक्ष आपण आहोत. निवडणूक आयोगाच्या परवानगीने शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. अशा संकटाच्यावेळी निवडणूक आयोगदेखील मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करते, असा आपला अनुभव आहे. निवडणुका येतील व जातील, परंतु संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले काम आहे. आपण सांगोल्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून उद्या उस्मानाबादनंतर परभणी, धुळे या भागात पाहणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सुशीलकुमारांना सोलापूरकरांनी निवडून दिले. ते लोकसभेचे नेते झाले, हा सोलापूरकरांसाठी बहुमान आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे अनुभवी नेते असून अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. सर्वाशी मिळून मिसळून असणाऱ्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना माढय़ातून व शिंदे यांना सोलापुरातून निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी आपण व शरद पवार एकत्र काम करीत ते आपले मार्गदर्शक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष भावंड आहेत. आपण जर भांडत बसलो तर त्याचा फायदा जातीय व धर्माध शक्ती घेतील, अशी भीती व्यक्त केली. यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे भाषण झाले.
आपसात भांडत बसल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल- शिंदे
पंढरपुरातील दाते मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी सोलापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा मेळावा पवार व शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
First published on: 09-03-2014 at 02:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election sharad pawar sushilkumar shinde political