पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) अर्थसंकल्पीय संसद अधिवेशनात बोलताना विविध मुद्य्यांवरून काँग्रेसह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. तसेच, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेसमुळेच करोना वाढला असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मोदींच्या आजच्या भाषणानंतर आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला ‘चुनावजीवी’ स्वभाव काही सोडलेला नाही. करोना काळात महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनची फुकट तिकीटे देऊन कामगारांना पाठविण्यात आले आणि परिणामी पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये करोना वाढला, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या पंजाब, युपी आणि उत्तराखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे सध्या बिगुल वाजलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य योगायोग नक्कीच नाही. असं राष्ट्रवादी काँग्रेसने फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

तसेच, “वास्तवात एका रात्रीत घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांतून परप्रांतीय श्रमिक आपापल्या गावाला मिळेल त्या साधनाने, प्रसंगी रस्त्याने चालतही गेले. मग पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फक्त याच राज्यांचा उल्लेख का केला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे.”

PM Modi in Lok Sabha : काँग्रेस ‘टुकडे टुकडे गँग’ची लीडर बनलीय : मोदी

याचबरोबर, “लॉकडाउन नंतर केंद्र सरकारने श्रमिक ट्रेन चालविल्या होत्या. सर्वाधिक ट्रेन या गुजरात राज्यातून सुटलेल्या आहेत. तर उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ट्रेन गेल्या होत्या. ही माहिती केंद्र सरकारच्यावतीने १६ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत दिली गेली होती. मात्र पंजाब राज्यात श्रमिक ट्रेन गेल्या नव्हत्या. पंजाब राज्यातून खूप कमी लोक बाहेरच्या राज्यात कामगार म्हणून जातात. उलट उत्तरेतील अनेक राज्यातील कामगार हे पंजाबमध्ये शेतीच्या कामावर जात असतात. असे असतानाही पंजाबमध्ये करोना वाढवण्यामागे महाराष्ट्राचा बादरायण संबंध जोडण्यामागचा पंतप्रधानांचा हेतू स्पष्ट आहे. फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही. असं म्हणत पंतप्रधान मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली गेली आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elections in punjab up uttarakhand in front of modis eyes while speaking in lok sabha ncp msr