देशात डिझेलवर चालणाऱ्या वीज उत्पादक जनित्राची जागा येत्या काही वर्षांतच हायड्रोजनवर चालणारे जनित्र (फ्युएल सेल) घेऊ शकतील. हे तंत्रज्ञान वापरल्यास नैसर्गिक वायूची उपलब्धता असणाऱ्या ग्रामीण भागांमधील विजेचा प्रश्नही सुटू शकणार आहे.
सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट (सिक्री- चेन्नई), नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (दिल्ली) आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल- पुणे) या संस्थांतर्फे एकत्रितपणे हे संशोधन करण्यात येत असून, या प्रकल्पात १ किलोवॉटचा फ्युएल सेल तयार करण्यात आला आहे. येत्या दीड वर्षांत ३ किलो वॉटच्या फ्युएल सेलची प्रत्यक्ष कार्यक्षमता किती आहे, ते तपासण्यात येणार आहे. हा ३ किलोवॉटचा फ्युएल सेल मोबाईल टॉवरना विद्युत पुरवठा करू शकेल.
एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले या संशोधनाचे नेतृत्व करीत आहेत. ‘पॉलिमर पदार्थाचे वर्तन’ हा डॉ. लेले यांच्या अभ्यासाचा विषय आहे. या प्रयोगात पॉलिमर पदार्थापासून फ्युएल सेलमध्ये वापरण्यासाठीच्या जेल मेम्ब्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. हे जेल मेम्ब्रेन पाणी किंवा अ‍ॅसिड शोषून घेऊ शकत असल्याने ते फ्युएल सेलमध्ये प्रोटॉनच्या प्रवाहीपणासाठी उपयुक्त ठरते. डॉ. लेले यांना नुकताच ‘इन्फोसिस-२०१२’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल एनसीएलतर्फे मंगळवारी डॉ. लेले यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. सौरव पाल या वेळी उपस्थित होते. या वेळी डॉ. लेले यांनी संशोधनाबाबतची माहिती दिली.
डॉ. लेले म्हणाले, ‘‘हायड्रोजनवर चालणारे फ्युएल सेल तंत्रज्ञान नवे नाही. मात्र, भारतात त्याचे उत्पादन होत नसल्याने तो आयात करावा लागतो. हे संशोधन वापरून हा फ्युएल सेल देशातच आणि तुलनेने कमी खर्चात तयार करणे शक्य होईल. मोबाईल टॉवरला विद्युत पुरवठा करण्यासाठी १२ केव्हीए क्षमतेचे जनित्र वापरले जाते. त्याचा खर्च अडीच लाखापर्यंत जातो. पण खरेतर एवढय़ा क्षमतेच्या जनित्राची मोबाईल टॉवरसाठी आवश्यकता नसते. या जनित्राच्या जागी ३ किलोवॉटचा हायड्रोजन फ्युएल सेल वापरता येईल. त्याचा उत्पादन खर्चही १२ केव्हीएच्या जनित्राएवढाच असेल.
आपल्याकडे ग्रामीण भागांतही नैसर्गिक वायूच्या पाईपलाईन्स उपलब्ध आहेत. नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन वेगळा काढला आणि त्यावर फ्युएल सेल चालवला तर या गावांना लागणारी वीज तयार करता येईल. विशेषत: हायड्रोजन वायू ‘बाय प्रॉडक्ट’ म्हणून तयार होतो अशा रासायनिक कंपन्यांनाही तो वायू फ्युएल सेलसाठी वापरून कंपनीला लागणारी वीज स्वत: तयार करता येईल. देशात अशा ३७ कंपन्या आहेत. त्यांनी फ्युएल सेल वापरण्यास सुरूवात केली तर त्यांचे ग्रीडमधील विजेवरचे अवलंबित्त्व २० टक्क्य़ांनी कमी होऊ शकेल. फ्युएल सेलचे विविध घटक बनविणारे उद्योजक देशात तयार व्हावेत व सध्या जनित्र बनविणाऱ्या कंपन्यांनी फ्युएल सेलच्या निर्मितीत उतरावे अशी या प्रकल्पाची अपेक्षा आहे.’’     

Story img Loader