|| राजेश्वर ठाकरे

वीज प्रकल्पांच्या पुरवठय़ासाठी प्रवासी गाडय़ांपेक्षा मालगाडय़ांना प्राधान्य

निवडणुकीच्या वर्षांत कोळशाच्या तुटवडय़ापायी भारनियमनाची होऊन मतांची ‘ऊर्जा’ खंडित होऊ नये यासाठी थेट रेल्वे मंत्रालयानेच विशेष लक्ष घातले आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार आता विदर्भातील कोळसा वाहतुकीकरिता मालगाडय़ांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी काही प्रवासी रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर २०१७ मध्ये राज्यातील १५ पैकी १४ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यापैकी सहा केंद्रांत चार दिवस पुरेल इतकाच कोळसा होता. राज्य सरकारच्या अमरावती, भुसावळ आणि परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात तर एका दिवसापुरता कोळसा उरला होता. त्यामुळे काही भागांत अघोषित भारनियमन करावे लागले होते. या वर्षी  पावसाळ्याचे पाणी खाणीत शिरल्याने कोळसा उत्पादन आणि पुरवठा कमी झाला आहे. ही बाब ऑक्टोबर महिन्यात लक्षात आल्यानंतर वीजनिर्मिती केंद्राला जास्तीत जास्त कोळसा पोहोचवण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल-मे २०१९ मध्ये होतील. त्या वेळी भारनियमन करावे लागू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दिल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने तर कोळसा वाहतुकीसाठी डिसेंबर महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी रात्रीच्या वेळेस खास वाहतूक पट्टा अर्थात ‘कॉरिडोर’ तयार केला आहे. या वेळेत  मालगाडीसाठी मार्ग मोकळा करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी काही प्रवासी रेल्वेगाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, तर काही रेल्वेगाडय़ा रद्द केल्या आहेत.

खास राखीव वेळ

डिसेंबर महिन्यात प्रत्येक सोमवारी बिलासपूरहून रात्री पावणेनऊ ते पहाटे साडेचारदरम्यान तसेच प्रत्येक मंगळवारी नागपूरहून पहाटे साडेचार ते रात्री साडेबारापर्यंत केवळ मालगाडय़ांना मार्ग मोकळा राखला जात आहे.

मध्य प्रदेशातील खाणीतून महाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळसा तातडीने पुरवण्यासाठी काही पॅसेंजर रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मालगाडय़ांना अशा प्रकारे अस्थायी ‘कॉरिडोर’ करून देण्यात आला आहे.  – आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.

  • इतवारी (नागपूर) -टाटा नगर पॅसेंजर ही गाडी दर सोमवारी इतवारी ते बिलासपूरदरम्यान रद्द.
  • गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रत्येक मंगळवारी गोंदियाहून निर्धारित वेळेपेक्षा पावणेदोन तास विलंबाने सुटणार.
  • गोंदिया-इतवारी (नागपूर) गाडी मंगळवारी गोंदियाहून निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास विलंबाने सुटणार.
  • तिरोडा-इतवारी (नागपूर) पॅसेंजर प्रत्येक मंगळवारी तुमसर येथून निर्धारित वेळेपेक्षा एक तास विलंबाने सुटेल.