लोकसत्ता वार्ताहर

जालना : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला तरी वीज चोरीचे प्रकार जालना जिल्ह्यात घडत आहेत. जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख ग्राहकांकडे ‘महावितरण’ची ११२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या पडताळणीची मोहीम ‘महावितरण’ने हाती घेतली असून, त्यामध्ये वीजचोरीचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यानंतर ‘महावितरण’ने अशा प्रकारे गुन्हे नोंदविले आहेत.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या पडताळणीत शहागड (ता. अंबड) परिसरात पाच जण वीजचोरेी करीत असल्याच अलिकडेच आढळून आले. लघु दाब वीजवाहिनीवर वायरच्या सहाय्याने आकडा टाकून तसेच वीज मीटर वगळून घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी ही वीजचोरी होत असल्याने ‘महावितरण’ पथकाच्या तपासणीत समोर आले. या पाच जणांनी २ लाख ९० हजार रुपयांची वीजचोरी केल्याच्या आरोपावरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गेल्या फेब्रुवारीच्या शेवटी जालना तालुक्यात व्यवसायासाठी २५ लाखाची वीजचोरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुंडेवाडी गावाच्या शिवारातील याच ग्राहकावर मागील वर्षी दीड कोटीच्या वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केला होता. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या तपासणीत पुन्हा वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला. मागील वर्षी या ग्राहकाने ३ लाख ८६ हजार ४१७ युनिट वीजचोरी केल्याचे उघडकीस आले होते. तर या वर्षी पुन्हा ५७ हजार ९३० युनिट वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

वीजपुरवठा खंडित केल्यामुळे ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचे प्रकारही अलिकडच्या काळात जिल्ह्यात घडले आहेत. थकबाकीमुळे वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आल्याने घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. देयक वसुली आणि थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या ‘महावितरण’च्या तंत्रज्ञास हातात कोयता घेऊन शिवीगाळ व धमक्या देण्याच्या प्रकरणात गेल्या जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात जालना शहरातील पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला आहे.

Story img Loader