राज्यात सध्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धतेत तफावत निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे. आधीच तापमान वाढलेलं असताना लोडशेडिंग होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर शहरात शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरूवारी रात्री घेतलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरूवारी रात्री राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचे सांगत जास्त वीज हाणी व वीज चोरी असलेल्या भागातच भारनियमन होत असल्याचं सांगितलं. याप्रसंगी त्यांनी महावितरण वीज चोरीच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा दावाही केला होता. त्याला काही तास उलटत नाही तोच गुरूवारी रात्रीच शिवसेना नेते संजय राऊत यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे शहर असलेल्या नागपुरातील गजाननगर परिसरात घेतलेली सभाच चोरीच्या वीजेतून झाल्याचं पुढं आलं आहे.
सभेतील रोषणाईसह स्पीकर तसंच इतर गोष्टींसाठी आवश्यक वीज आकडे टाकून थेट महावितरणच्या वीज वाहिनीवरून चोरट्या पद्धतीने घेण्यात आली होती. त्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या दाव्याप्रमाणे महावितरण या प्रकरणात कुणावर काय कारवाई करून गुन्हा दाखल करणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान एकीकडे राज्यातील जनतेला यंदाचा उन्हाळा वीज टंचाईमुळे काही प्रमाणात भारनियमनाच्या संकटात काढावा लागणार असतानाच दुसरीकडे राजकीय पक्षांच्या सभांमध्ये राजरोसपणे वीजचोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
“सभास्थळाच्या मागे गजानन महाराजांचे मंदिर होते. तेथील संचालकांच्या परवानगीने आम्ही तेथून वीज पुरवठा घेतला होता. डेकोरेशनचे काम दिलेल्या व्यक्तीने एखादा हॅलोजन चुकीच्या पद्धतीने कुठून घेतला काय? याची आमच्याकडून विचारणा झाली आहे. आम्ही कोणतीही वीजचोरी केली नाही,” असं शिवसेनेचे शहप्रमुख नितीन तिवारी यांनी सागितलं आहे.
“महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहे. संध्याकाळपर्यंत अहवाल आल्यावर त्यात कुणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल,” असं महावितरणचे जनसंपर्क अधिकारी प्रविण स्थूल यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया –
दरम्यान संजय राऊत यांनी यावर बोलताना “मलाही कळलं की वीज चोरी झाली आहे. आम्ही पक्षांतर्गत समिती स्थापन करू आणि चौकशी करू,” अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.