रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर असणा-या संगमेश्वर निढलेवाडी येथे टाटा सुमो आणि इर्टीका यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मिळालेल्या माहितीनुसार, शिशिर शांताराम सावंत (वय ४९) रा. कीर्तीनगर, रत्नागिरी हे त्यांच्या मालकीची टाटा सुमो ( क्र.एम एच ४६ एक्स ०४४१) घेवून रत्नागिरी ते चिपळूण वहाळ येथे भरणाऱ्या आठवडा बाजारात मच्छी विकणाऱ्या रत्नागिरी मिरकरवाडा येथील महिलांना घेऊन गेले होते.
संध्याकाळी बाजार संपल्यावर मासे विकणाऱ्या महिलांना घेऊन रत्नागिरीकडे येत असताना संगमेश्वर निढलेवाडी येथील राजेश्री पेट्रोल पंपासमोर आले असता गोव्याच्या दिशेने वेगात जाणाऱ्या इर्टीका गाडीने (क्र. एमपी०९ झेड एक्स ०२३०) समोरुन जोरदार धडक दिली. ही गाडी दीपक पंढरी आर्से (वय २३) रा. भरगोंन, मध्यप्रदेश, हा चालवीत होता. त्याने चुकीच्या दिशेने येत सुमोला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत सुमो गाडी रस्त्यावर पलटी होत पुन्हा रस्त्यावर उभी राहिली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात सुमो गाडीतील जुलेखा आलिमियाँ तांडेल (वय ५०), बेबीनाज अल्लाउद्दीन मुकादम (वय ६०), हसीना लियाकत कोतवडेकर (वय ५०), राबिया आलिमियाँ राजपूरकर (वय ५०) सर्व राहणार मिरकरवाडा,रत्नागिरी, सुमो चालक शिशिर शांताराम सावंत (वय ५०) कीर्तीनगर रत्नागिरी, तर इर्टीका वाहनातील दीपक पंढरी आर्से (वय २३), योगेश उमाकांत गरदे (वय ४८) ,लता उमाकांत गरदे (वय ६९), मुदिता योगेश गरदे (वय ४२), उमाकांत रामचंद्र गरदे (वय ७८), आराध्या योगेश गरदे (वय ११ वर्ष) सर्व राहणार भरगोंन, मध्यप्रदेश यातील काही किरकोळ तर काही गंभीर दुखापती झाल्या आहेत. यासर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी अभिजित मोरे यांनी प्राथमिक उपचार केले. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी घटनास्थळी जावून रहदारी मोकळी केली. तसेच या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत..