मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांनी अंतरिम वैद्यकीय जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.दोन वर्षांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या बाबू यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, पोटाचे दुखणे आणि हाडांशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
आपल्याला भेडसावणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत आणि त्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेऊ देण्याच्या परवानगीसाठी कारागृह अधिकारी आणि विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा बाबू यांनी याचिकेत केला आहे.
हेही वाचा >>> जुहू हत्या प्रकरण : मृत महिलेची भीती खरी ठरली…दुसरी तक्रार केल्यानंतर सहा दिवसांनी महिलेची हत्या
मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावत असल्याचा आणि पोटात आणि गुडघ्यांमध्ये असह्य वेदना होत आहेत. त्यामुळे तातडीने या तिन्हीची चाचणी करणे आणि त्यानुसार उपचार सुरू करण्याची आवश्यकता आहे. आरोग्याच्या तिन्ही समस्यांमुळे दैनंदिन कामे करणे अडचणीचे होत आहे, असा दावाही बाबू यांनी केला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर बाबू यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी बाबू यांना वैद्यकीय चाचणीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला देण्याची मागणी त्यांचे वकील युग चौधरी यांनी न्यायालयाकडे केली. बाबू यांच्या मागणीला प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) वकील संदेश पाटील यांनी आक्षेप घेतला नाही. परंतु वैद्यकीय चाचणीच्या वेळी बाबू यांच्या नातेवाईकांनी उपस्थित असण्यावर आक्षेप घेतला. बाबू यांच्या नातेवाईकांकडून वैद्यकीय अहवावात फेरफार करण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली. त्यानंतर बाबू यांनी याचिकेसोबत जोडलेले वैद्यकीय अहवाल पाहण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएला दिले. तसेच याचिकेवरील सुनावणी १३ डिसेंबर रोजी ठेवली.