खोटी कर्जप्रकरणे तसेच बनावट दस्तऐवज तयार करून टाकळीढोकेश्वर येथील वसंतदादा पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचा-यांनी संगनमताने १ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र रघुनाथ गागरे यांच्यासह ३४ जणांविरुद्घ गुन्हे दाखल करण्यात आले असून तालुक्यातील आणखी एका पतसंस्थेचा घोटाळा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वसंतदादा पतसंस्था अडचणीत आल्यानंतर गेल्या वर्षी ही संस्था राहता येथील वर्धमान पतसंस्थेत विलीन करण्यात आली होती. विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच हातावरील रकमेच्या नावाखाली करण्यात आलेला अपहार दडपण्यासाठी खोटय़ा दस्तऐवजांच्या आधारे कर्जप्रकरणे केल्याचे भासवून वर्धमान पतसंस्थेचीही फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. राहता येथील प्रमाणित लेखापरीक्षक लहानू थोरात यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांनी वसंतदादा पतसंस्थेचे दि. १ एप्रिल १२ ते ३१ मार्च १३ या आर्थिक वर्षांच्या कामकाजाचे लेखापरीक्षण केले असता संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये अपहार झाल्याचे उघड झाले.
संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गागरे यांच्यासह सोमनाथ झावरे, कृष्णा बांडे, दत्तात्रय बांडे, दामोदर झावरे, नारायण झावरे, भगवान वाघ, हरिभाऊ न-हे, खेमा मधे, अश्विनी खिलारी, विलास नवले, अनिल गांधी, विजय पुरी, जगन्नाथ जगधने, जयसिंग खोडदे, अंकुश खिलारी (सर्व राहणार टाकळीढोकेश्वर, ता. पारनेर), अशोक गागरे, सुनंदा पायमोडे, तात्याभाऊ मुसळे (सर्व रा. वनकुटे), उत्तम वाबळे, संदीप झावरे, शिवाजी पायमोडे (सर्व रा. वासुंदे), अशोक बिडे, मुक्तार कुतुबुद्दीन शेख (रा. ढवळपुरी), राजेंद्र रोकडे, गणपत राशीनकर (रा. वडगांवसावताळ), तुळशिराम आहेर (रा. खडकवाडी), संपत वाळुंज, श्रीकांत झावरे (रा. काकणेवाडी), सर्जेराव घंगाळे (रा. हिवरेकोर्डा), सोपान जपे (रा. खातगाव टाकळी), जिजाराम जाधव (रा. वावरथ जांभळी, ता. राहुरी), प्रणवकुमार मोरे आणि निर्मला मोरे (रा. जामखेड) या ३४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader