सोलापूर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. तसेच घंटानादही केला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटनेने राज्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालावधीपासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केल्याचे पाहायला मिळाले.

जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व पदोन्नतीमधील स्तर कमी करणे इत्यादीबाबत शासन पातळीवर हेतूतः दुर्लक्ष व उदासीनता असल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेसमोर कर्मचारी युनियनच्या सोलापूर शाखेच्यावतीने घंटानाद करण्यात आला. प्रलंबित मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे विभागीय संघटक डॉ. शत्रुघ्नसिंह माने जिल्हाध्यक्ष, तजमुल मुतवल्ली सचिव विलास मसलकर, निर्मला राठोड, बसवराज दिंडोरे, स्वाती स्वामी, संतोष शिंदे, मृणालिनी शिंदे, आरती माढेकर, दयानंद परिचारक, रफिक शेख आदी उपस्थित होते.

Story img Loader