सरकारच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवरील लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता ठेवावी. तसेच जनतेनेही आपल्या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टीने काम करून घेण्याबाबत कर्तव्य समजून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना आयोजित शिबिराचे उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार आदींची उपस्थिती होती. सुवर्णजयंती राजस्व अभियानातील वन विभाग, आरोग्य जननी माता सुरक्षा, राजीव गांधी जीवनदायी, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आदी ११ योजनांमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व साहित्य वाटप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
गतवर्षी िहगोलीवगळता मराठवाडय़ात सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, मराठवाडय़ात जलसंधारणाची कामे काही प्रमाणात यशस्वी झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने यापुढे जलसंधारण कामावर अधिक भर देणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यातील सुवर्णजयंती राजस्व अभियानातील कामांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कळमनुरी तालुक्यात घोळवा येथील साठवण तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन जयस्वाल यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा