नाशिक महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवीत तब्बल आठ जणांना २० लाख रुपयांना गंडवल्याची घटना तालुक्यात घडली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नाशिक येथील दोघांना नांदगाव न्यायालयाने १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
येथील सोपान बोराडे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मोहेगाव येथील साहेबराव सखाराम हारदे यांनी नाशिक पालिकेत जवळचे नातेवाईक मोठय़ा पदावर असल्याने ते पालिकेत नोकरीला लावून देतील, असे बोराडे यांना सांगितले. त्यानुसार दहेगाव येथे राहुल वनारसे, मनोज वनारसे, विमलबाई वनारसे, सुनीता वनारसे यांनी २०१३ मध्ये महानगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात पंपचालक, शिपाई, ऑपरेटर, हेल्पर या जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती बोराडे यांना दिली. परंतु एकेका जागेसाठी पालिकेतील अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे लागतील. त्यापैकी निम्मी रक्कम आधी द्यावी लागेल. उरलेली रक्कम नोकरीचा आदेश आल्यानंतर द्यावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. ही सर्व मंडळी हादरे यांच्या संपर्कातील असल्याने बोराडे यांनी रक्कम देण्याचे ठरविले. त्यानुसार पाच ते सहा दिवसांनी सोपान बोराडे यांच्यासह त्यांचे नातेवाईक किशोर बोराडे, शेषराव बोराडे, कुणाल गायकवाड, बाळू शिंदे, पुंडलिक गुमनर, नामदेव तांबे, अंकुश थोरात, छाया थोरात या सर्वानी पंपचालक, शिपाई, ऑपरेटर, हेल्पर या जागांसाठी २० लाख ५० हजार रुपये जमा करून वनारसे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पालिका आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने तब्बल ४९ जणांची भरती झालेल्यांची यादी संबंधित लोकांना दाखविण्यात आली. त्या यादीत नाव असल्याची खात्री झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचा निर्णय बोराडे यांनी घेतला. त्यानुसार वनारसे यांनी महापालिकेचा नोकरीचा आदेश देऊन १५ दिवसांत पालिकेत हजर होण्यास सांगितले. संबंधितांनी याबाबत शहानिशा करण्यासाठी महापालिकेत जाऊन चौकशी केली असता नोकरीचा आदेश बनावट असल्याचे आढळून आले. या संदर्भात बोराडे यांनी वनारसे कुटुंबीयांकडे विचारणा केली असता नवीन आदेश काढून देण्याची बतावणी त्यांनी केली. त्यानंतर तुम्ही दिलेल्या रकमेचे धनादेश तुम्हाला देतो. आदेश आल्यानंतर धनादेश व उर्वरित पैसे द्यावे लागतील, असे सांगून वनारसे कुटुंबीयांनी देवळाली सहकारी बँकेचे राहुल वनारसे अशी स्वाक्षरी असलेले धनादेश दिले. विशेष म्हणजे यानंतर पुन्हा गावाकडे जाऊन धनादेश परत घेऊन पैसे आणून देतो, असे सांगत पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बोराडे यांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आज ना उद्या नोकरीचे आदेश येतील, या आशेवर ते होते. परंतु वनारसे यांनी संपर्कही बंद केल्यानंतर बोराडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. राहुल अंबादास वनारसे, मनोज अंबादास वनारसे, विमलबाई वनारसे, सुनीत वनारसे (रा. आनंद कृषी शाळेसमोर आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांच्याविरुद्ध २० लाख ५० हजार रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली म्हणून नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
 पोलिसांनी मनोज वनारसे व विमल वनारसे यांना अटक करत नांदगाव न्यायालयात उपस्थित केले असता १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.