कृषी व ग्रामीण पर्यटनाला बांबूची साथ महत्त्वाची आहे. बांबू पर्यावरण पूरक असून बांबूच्या वस्तू व झोपडय़ाचे पर्यटकांना आकर्षण असते, असे कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर यांनी सांगितले.
डी. के. टुरिझम व सिंधुदुर्ग कृषी आत्माच्या संयुक्त विद्यमाने कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ग्रामीण व कृषी पर्यटन संकल्पना व पर्यटन विकासाच्या संधी या विषयावर मोहन होडावडेकर यांनी मांडणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील साधनसंपत्तीचा योग्यप्रकारे वापर झाल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मातीमोल बांबूला मोठी मागणी असून त्यावर प्रक्रिया केल्यास ५० ते १०० वर्षे टिकू शकतो. बांबूचा कृषी पर्यटनाशी घनिष्ट संबंध आहे असे मोहन होडावडेकर यांनी सांगितले.
बांबू पर्यावरण पूरक असून तो ऑक्सिजन देण्याचे कामही करतो. त्यामुळे प्रदूषणकारी विळख्यात बांबू बँक फारच महत्त्वाची आहे, असे होडावडेकर यांनी सांगितले. बांबू निर्मित छप्पर, खुर्ची, अशा विविध वस्तूंना पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठी मागणी आहे. बांबूशी कृषी पर्यटनाची नाळ जोडा, असे आवाहन मोहन होडावडेकर यांनी केले.
द्वारका कृष्ण पर्यटन संस्थेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी रेल्वे आरक्षणाचा फटका कोकणच्या पर्यटनावर बसत असल्याचे सांगत रेल्वेला आरक्षणच मिळत नाही तसेच रेल्वे गाडय़ांशी कोकणशी नातेच जुळले नसल्याचे त्यांनी सांगून बिनशेतीपासून विविध अडचणी प्रशासनाकडून आणल्या जात असल्याचे सांगितले.
बँक ऑफ इंडियाचे मनोहर माने यांनी कृषी ग्रामीण पर्यटनासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज दिले जात आहे. या शून्य व्याजदराच्या कर्जाला जामीनही नाही, फक्त मालमत्ता असावी. तसेच आंबा-काजूसाठीही तुम्ही कर्ज घेऊ शकता, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाबार्डच्या श्रीमती मानकामे यांनी नाबार्डकडे एखादी कंपनी स्थापन करून मागील तीन वर्षांच्या ऑडीटसह प्रस्ताव सादर केल्यास नाबार्ड कर्ज देऊ शकते असे स्पष्ट केले. या वेळी वसीम सरकवास, कृष्णराव माळी, मोहन कदम, पर्यटनचे माजी अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी, डॉ. जी. ए. बुवा, चंद्रशेखर उपरकर यांनी मागणी केली.
या पर्यटन परिषदेच्या सांगता समारंभात नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका पर्यटन क्षेत्रातील विविध उपक्रम राबवीत आहे, पण शासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे भाडे आकारणी जास्त होत आहे, त्यामुळे शिल्पग्राम, पर्यटन स्वागत कक्षासारख्या प्रकल्पांना अडथळे निर्माण झाले आहेत. पर्यटन विकास टिकविण्यासाठी आम्ही धडपडत आहोत, पण शासनाची पॉलिसी बदलली पाहिजे, असे ते म्हणाले.
उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी पर्यटन विकासाच्या प्रत्येक कामात नगरपालिका पुढाकार घेत आहे. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर. जी. पाठक यांनी आभार मानले. जिल्ह्य़ातील अनेकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
सिंधुदुर्गात पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – मोहन होडावडेकर
कृषी व ग्रामीण पर्यटनाला बांबूची साथ महत्त्वाची आहे. बांबू पर्यावरण पूरक असून बांबूच्या वस्तू व झोपडय़ाचे पर्यटकांना आकर्षण असते, असे कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर यांनी सांगितले.
First published on: 12-02-2013 at 04:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment will generate in sindhudurg from tourisum mohan hodavadekar