सोलापुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. यामध्ये एक दरोडेखोर ठार झाला आहे, मात्र त्याचसोबत तीन पोलिसही जखमी झाले आहेत. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ हा प्रकार घडला. दरम्यान, जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना उळे गावाजवळ पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले आणि एकाला पकडून गाडीत बसवत असताना तो दरोडेखोर पोलिसांना ‘साहेब.. चुकले चुकले,’ म्हणत होता. त्याचवेळी त्याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला, तसेच दगडफेकही केली.
या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक पाटील यांनी दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला, यामध्ये एक दरोडेखोर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे, घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या असून यातील एका गाडीचा क्रमांक Mh-13 AZ / 1798 असा आहे. एका गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या गाड्या पोलिसांच्या आहेत की दरोडेखोरांच्या, याचीही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या चकमकीत पाटील यांच्याशिवाय अन्य दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.