Swikriti Sharma Takes Nomination Back from Vidhansabha Election : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी देणार असल्याचं वचन दिल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली असल्याचं त्या ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानू इच्छिते. गेली १० वर्षे आम्ही समाजसेवेत आहोत. आम्हाला एका मोठ्या क्षेत्रात काम करण्याची संधी हवी होती. त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला. परंतु, आता मुख्यमंत्र्यांनी मला विधान परिषदेचं आश्वासन दिलं आहे. ती सुद्धा माझ्यासाठी मोठी संधी आहे”, असं स्वीकृती शर्मा म्हणाल्या.

स्वीकृती शर्मा यांनी २६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अंधेरी पूर्व येथून त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. भाजपाचे मुरजी पटेल आणि शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून तृप्ती देसाई यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचा >> Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले

“नेहमी ठरल्याप्रमाणे होत नाही, पण हे राजकारण आहे. अंधेरी पूर्व भागातील २५,००० समर्थकांसह आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यावर लोक माझ्या पत्नीला पाठिंबा देतील, असा मला विश्वास आहे. आम्हाला तिकीट न मिळण्याची कारणे असू शकतात, परंतु आम्ही अपक्ष म्हणून उभे आहोत”, असे शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. तर,  “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लोकांची सेवा करत राहीन असं स्वीकृती म्हणाल्या होत्या.

“आम्ही राजकारणात कधीच गुंतलो नाही आणि भविष्यातही राजकारण करण्याची आमची योजना नाही. आमचा भर जनतेची सेवा करण्यावर आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षावर नाराज नाही, पण निवडलेल्या उमेदवारामुळे आम्ही निराश आहोत. लोक त्यांचे खरे प्रतिनिधित्व कोण करते हे जाणून घ्या”, असंही त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या.

Story img Loader