हिंगोली : शहरातील ऐतिहासिक जलेश्वर मंदिर तलाव परिसरातील १९५ अतिक्रमणधारकांचे बांधकाम काढण्याच्या शुक्रवारी सुरू झालेल्या मोहिमेला शनिवारी दुपारी अचानक हिंसक वळण लागले. काही अतिक्रमणधारकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या ११२ क्रमांकाच्या वाहनाची काच फुटली तर नगरपालिकेचा एक कर्मचारी व पत्रकारही जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याची माहिती मिळताच पोलीस, महसूलचे प्रमुख अधिकारी आदी ताफ्यासह दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांचे पथसंचलन करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनेनंतर धरपकडची कारवाई सुरू केली आहे. जलेश्वर मंदिर तलाव परिसरात शुक्रवारी सुरू झालेल्या मोहिमेत जवळपास ७० ते ८० टक्के बांधकाम केलेल्या घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले गेले. शनिवारी नगरपालिकेचे काही कर्मचारी त्या परिसरात दुपारी एक वाजता गेले असता अतिक्रमणधारकांनी अंबिका टॉकीज नजीक रस्ता रोको आंदोलन केले.
हेही वाचा: “…याचा अर्थ याला ठाकरेंची मूक सहमती आहे”, आमदार नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्र!
दरम्यान, अतिक्रमणधारकांकडून दगडफेकही करण्यात आली. यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी पंडित मस्के व वार्तांकन करणारे पत्रकार ज्ञानेश्वर लोंढे जखमी झाले. त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दगडफेकीबाबतची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, तहसीलदार नवनाथ वगवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, महसूलचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आदी अधिकारी संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. रस्ता रोको करणाऱ्या सुमारे २० ते २५ महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून आता धरपकडची कारवाई सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरात पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. त्या परिसरात यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावल्याने आता त्या भागात तणावपूर्ण शांतता आहे.