महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. या मुदतीत तेथील अतिक्रमणे निश्चितपणे हटवली जातील असा विश्वास वाटतो, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
हेही वाचा- “नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यानंतर संभाजीराजे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणांना पावसाळ्याच्या अगोदर नोटिसा दिलेल्या आहेत. कायदेशीर पूर्ण करून महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठकीत दिली आहे.
पुरातत्व विभाग जबाबदार
आजची बैठक पहिली आणि शेवटची असून आता प्रशासनाने ठोस कृतीच करणे अपेक्षित आहे. विशाळगडावरील अतिक्रमणास आणि निकृष्ट संवर्धन यास पुरातत्व विभागही तितकाच उत्तरदायी आहे. ५ कोटी रुपये खर्च करून अतिशय खराब असे काम तिथे झालेले आहे. इतके वर्षे विशाळगडावर अतिक्रमण होत असतांना पुरातत्व विभाग काय करत होता? असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी केला.