लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : अनेक वर्षे आमदार व मंत्रीपदाचा वापर कारखानदारी वाढविण्यासाठी करणाऱ्या जयंत पाटील यांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम देण्यासाठी शेतकऱ्यांनी महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील (दादा) यांना मोठे मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आ. सदाभाऊ खोत यांनी केले.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ बावची, पोखर्णी, ढवळी, बागणी, भडखंबे, नागाव, कोरेगाव, फार्णेवाडी (शि), शिगाव, रोझावाडी, फाळकेवाडी, गोटखिंडी येथे जुने कार्यकर्ते, तरुण मतदार यांच्या गाठी-भेटी दरम्यान आयोजित बैठकीत ते बोलत होते.

आणखी वाचा-सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न

आ. खोत म्हणाले, सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीत फारसा बदल नाही. असे असले तरी सांगली जिल्ह्यात जादा साखर उतारा असणारे अनेक कारखाने आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने ते दर देत नाहीत. आ. पाटील अनेक वर्षे ते जिल्ह्यातील ऊसदर कोंडी फोडण्यापासून पळ काढत असल्याचे आपण पाहिले आहे. ते शेतकऱ्यांची गळचेपी करून आपल्या सोयीप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला बनवतात. यातून ऊस पुरवठादाराचे कसे शोषण होईल हेच धोरण त्यांचे असते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आणखी वाचा-महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

उमेदवार श्री. पाटील म्हणाले, येथील विद्यमान आमदार जिल्ह्यातील दुसऱ्या कारखान्यांनाही दर देऊ देत नाहीत. त्यांच्यावर दबावतंत्र अवलंबतात. त्यांच्या राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी या तीन युनिटमधूनच ऊस दराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो.