भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आज पत्रकारपरिषद घेत, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. याचबरोबर, नितीन राऊत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी केली आहे. युवक काँग्रेसच्या निवडणुकीस उभा असलेल्या आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी नितीन राऊत यांनी महावितरणची यंत्रणा कामाला लावली आहे, असा गंभीर आरोप विक्रांत पाटील यांनी केला आहे. याचबरोबर या पत्रकारपरिषदेत महावितरणचे अधिकारी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीचा व्हिडिओ देखील दाखवला गेला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या या पत्रकारपरिषदेस भाजपा नेते आशिष शेलार, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह भाजपा युवामोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, “आपल्याला माहिती आहे की युवक काँग्रेसची अंतर्गत निवडणूक सध्या सुरू आहे. राज्यभराच्या प्रदेशाध्यक्षांपासून अनेक पदांसाठीची ही निवडणूक आहे. त्यांच्या या निवडणुकीला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. पण आमचा आक्षेप हा आहे की, या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत जे या मागच्या संपूर्ण कारकिर्दीमधील सगळ्यात अयशस्वी ऊर्जामंत्री म्हणून समोर आलेले आहेत. राज्याच्या उर्जा विषयक प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करून, शेतकऱ्यांपासून ते युवकांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्याची माती करणारे ऊर्जामंत्री म्हणून ते समोर आलेले आहेत. राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष न देता, स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता अधिक करणारे ऊर्जामंत्री म्हणून त्यांचं दुसरं रूप आता आपल्याला बघायला मिळत आहे.”
तसेच, “ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा सुपूत्र कुणाल राऊत हा या निवडणुकाला उभा आहे. या निवडणुकीत नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या उर्जा खात्याच्या महावितरणचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम नितीन राऊत यांच्याकडून होताना दिसत आहे. संपूर्ण राज्यात हा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत, वरून दबाव आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खाली कंत्राटदार, कर्मचारी यांच्यावर दबाव टाकला जात आहे, की युवक काँग्रेसच्या या निवडणुकीत माझा मुलगा निवडून आला पाहिजे. म्हणून तुम्ही यंत्रणा लावा, जास्तीत जास्त नोंदणी करा आणि तुमचे सगळे कर्मचारी या विषया लावून माझ्या मुलाला राज्याचा अध्यक्ष करायचं. असं स्वप्न नितीन राऊत बघत आहेत.” असा आरोपही यावेळी विक्रांत पाटील यांनी केला.
याचबरोबर, “या ठिकाणी उर्जा खात्याच्या माध्यमातून राज्याच्या असलेल्या अपेक्षांबाबत तर ते अयशस्वी ठरेलेलेच आहेत. राज्यातील गोरगरीबांच्या मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना नाही. त्यांना केवळ स्वत:च्या मुलाचं करिअर कसं घडेल, हा विषयच त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या दृष्टीने ते काम करत आहेत. मग हा जर विषय असेल तर आपण केवळ मुलाचं करिअर सेट करण्यासाठी स्वत:ला वाहून घ्यावं ही मागणी आमची आहे. तुम्ही उर्जा खात्याचा राजीनामा त्वरीत द्यावा, अशी आमची मागणी आहे.” असं देखील भाजपा युवा मोर्चाकडून सांगण्यात आलं.