लातूर : लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी होती. ‘लोकसत्ता’ मधूनही या मागणीचा पाठपुरावा केला होता.
५० कोटी रुपये खर्च करून इमारत बांधूनही दोन वर्षांपासून इमारत धुळखात पडून राहिल्या बाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आमदार अभिमन्यू पवार व आमदार संजय बनसोडे यांनीही पाठपुरावा केला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमधील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नव्हते. या नव्या महाविद्यालयामुळे गरीब विद्यार्थ्यांची सोय होईल, असा दावा केला जात होता.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसल्याही स्थितीत जूनपासून लातूरला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होईल असे आश्वासन तेव्हाच दिले होते. मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.