बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केल्यानंतर त्याविरोधात संबंधित मालक असलेल्या पोलीस निरीक्षकाने महापालिकेत येऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याबद्दल पोलिसात फिर्याद दाखल करण्यास सांगूनदेखील टाळाटाळ करून सेवेत गैरहजर राहणाऱ्या महापालिका बांधकाम परवाना विभागातील उपअभियंत्याला पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास प्रवृत्त केले. सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल न करता पळ काढल्यामुळे अखेर फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला पार पाडावी लागली. या घटनेचे पडसाद महापालिका सर्वसाधारण सभेत उमटले.
गेल्या आठवडय़ात सिद्धेश्वर पेठेतील जुन्या काडादी चाळीत पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांच्या पत्नी अस्मा मुजावर यांच्या मालकीच्या ‘हॉटेल आईना’चे बांधकाम बेकायदा असल्यामुळे हे बांधकाम पालिकेच्या पथकाने पाडून टाकले होते. मात्र या कारवाईला मुजावर दाम्पत्याने हरकत घेतली होती. त्यातच पोलीस निरीक्षक मुजावर यांनी याप्रकरणी कागदपत्रे घेऊन महापालिकेत बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता दीपक भादुले यांची भेट घेतली होती. त्या वेळी वाद होऊन मुजावर यांनी भादुले यांनी दमदाटी केल्याची तक्रार होती. हा घडलेला प्रकार महापालिकेतील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात बंद झाला असताना या घटनेची माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना समजली. त्यांनी त्याची दखल घेत संबंधितांवर तातडीने पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आदेश उपअभियंता भादुले यांना दिले होते. परंतु त्यांनी फिर्याद देण्यास टाळाटाळ तर केलीच, पण शिवाय आपला मोबाइल बंद ठेवून गायब झाले. त्यामुळे या प्रकरणाची फिर्याद अखेर पालिकेच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना द्यावी लागली. या घटनेमुळे संतापलेल्या आयुक्त गुडेवार यांनी भादुले यांना चांगलेच फटकारले. यातच भादुले यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती आयुक्तांनी एका झटक्यात मंजूर केली.
आयुक्तांच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक मुजावर यांनी महापालिकेत येऊन बेकायदा बांधकाम पाडल्याबद्दल गोंधळ घातला व उपअभियंता भादुले यांच्यासह अन्य काही बडय़ा राजकीय उच्चपदस्थांनाही शिवीगाळ केली. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध तातडीने फिर्याद देणे गरजेचे होते. परंतु भादुले यांनी टाळाटाळ केली. फिर्याद न देता गप्प बसल्यास उद्या आणखी कोणीही पालिकेत येऊन गंोधळ घालतील आणि त्यातून पालिका प्रशासनाची व्यवस्थाच धोक्यात येईल. भादुले यांनी आपले कर्तव्य न बजावता स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अधिक संतापजनक होती. त्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्त करण्यात आल्याचे गुडेवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपअभियंता भादुले यांना पोलीस निरीक्षक मुजावर यांनी केलेल्या दमदाटीच्या निषेधार्थ महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळय़ा फिती लावून काम केले. तर या संपूर्ण घटनेचे पडसाद पालिका सर्वसाधारण सभेत उमटले. सत्ताधारी काँग्रेस आघाडीतील काही नगरसेवकांनी संधी घेऊन आयुक्त गुडेवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त गुडेवार यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहताना सडेतोड शब्दांत निवेदन केले.