तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आज मोठा गोंधळ उडाला. मराठी माध्यमाच्या परिक्षार्थींना इंग्रजी माध्यमाचा गणिताचा पेपर देण्यात आला. ही बाब विद्यार्थ्यांच्या उशिरा लक्षात आली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांनी जमेल तशी उत्तरेही लिहिली होती. सुमारे अर्ध्या तासाने पुन्हा मराठी माध्यमाची प्रश्नप्रत्रिका देण्यात आली व संबधित शिक्षकांनी या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दक्ष पालकांमुळे हा प्रकार उघडकीस आला.
तालुक्यात आज विविध केंद्रांवर पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शहरात सहा केंद्रे होती. सकाळी अकरा वाजता तालुक्यात सर्वत्र सुरळीत परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर अकरा वाजता सुरू झाला. दुपारी एक वाजता गणिताचा पेपर होता. या पेपरच्या वेळी खेड येथे मराठी माध्यमाच्या एकाच खोलीमधील २० मुलांना इंग्रजी माध्यमाच्या व पाच मुलांना मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे लवकर लक्षात आले नाही. त्यांनी तसाच पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही उत्तरे अंदाजे लिहिली, मात्र नंतर त्यांनी हे परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना दाखवले असता, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेच संबंधित केंद्र संचालकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. काही वेळाने मुलांना मराठीतील प्रश्नप्रत्रिका देण्यात आली. मात्र उत्तरपत्रिका तीच ठेवण्यात आली, त्यामुळे अनेकांची उत्तरे चुकून त्यांचे नुकसान झाले. पेपर संपताच काही पालक शाळेत होते, त्यांना मुलांनी हा प्रकार सांगितला असता पालकांनी संबंधित शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात येथे गणिताचा पेपर पुन्हा घ्यावा, अशी मागणी पालक करीत आहेत. संबधित हलगर्जीपणा करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा