हर्षद कशाळकर

अलिबाग : गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा सुमारे ३२ लाख गणेशमूर्ती देशभरात रवाना झाल्या. करोना काळात विस्कटलेला व्यवसाय यंदा पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातून मागणी असते. या वर्षी पेणमधून सुमारे ३२ लाख गणेशमूर्ती देशविदेशात पाठवण्यात आल्या आहेत.

करोना साथीमुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा गेली दोन वर्षे व्यवसायाला फटका बसला होता, गणेशमूर्तीच्या उंची निर्बंधामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी होती. मोठय़ा गणेशमूर्तीना उठाव मिळत नव्हता. या वर्षी मात्र मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवल्यामुळे गणेशमूर्तीकारांमध्ये उत्साह संचारला आहे. शाडूच्या मूर्तीना मागणी वाढली. बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीपेक्षा यंदा शाडूच्या गणेशमूर्तीना अधिक मागणी होत आहे. या वर्षी पेण शहरात तयार झालेल्या ४० टक्के मूर्ती या शाडूच्या आहेत. एक ते दीड फुटांच्या शाडूच्या गणेशमूर्तीची जास्त प्रमाणात विक्री होत असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.

परदेशवारीही..

पेणमधून दरवर्षी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, मॉरिशियस आणि दुबई येथे गणेशमूर्ती मोठय़ा संख्येने पाठविल्या जातात. या वर्षी जवळपास ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. 

 मूर्तिकारांमध्ये  उत्साहाचे वातावरण आहे. पेण तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात गणेशमूर्ती देशविदेशात पाठविण्यात आल्या आहेत.

– श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेश मूर्तिकार संघटना

 यंदा गणेशमूर्तीना मागणी वाढली आहे. आम्ही गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे काम वाढले आहे, परंतु कुशल कारागीर मिळत नाही, ही एक समस्या आहे.

– सपना जाधव. गणेश मूर्तिकार पेण.

यंदा दर स्थिर.. दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतींमध्ये साधारणपणे १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. या वर्षी मात्र फारशी दरवाढ झाली नाही.

थोडी माहिती..

पेणमध्ये गणपती बनवणारे ४५० लहानमोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे ३० ते ४० लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. देशविदेशात या गणेशमूर्तीची विक्री केली जाते यातून जवळपास ५० ते ६० कोटींची उलाढाल होत असते.

२३०हून अधिक प्रकार..

मूर्तिकारांनी यंदा दोन ते अडीच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार करण्यावर भर दिला होता. या वर्षी  २३०हून अधिक प्रकारच्या सुबक आणि सुंदर गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

Story img Loader