कराड : जेजुरीतील मार्तंड जनाईदेवीच्या भक्तांसह निसर्गप्रेमींनी खंडोबाचा भंडारा, जनाईदेवीचा गुलाल व वृक्षबिया उधळून पाटण तालुक्यातील उंच काऊदऱ्यावर आज सोमवारी निसर्गपूजा केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळव खिंडीजवळ वसुंधरेचे जतन, हरितक्रांती व पर्जन्यवृष्टीकरिता गेल्या दोन दशकांपासून होणाऱ्या निसर्गपूजेला सालाबादप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपस्थितांमध्ये प्रथेप्रमाणे उदंड उत्साह पहायला मिळाला. निसर्गपूजेत वनखात्यानेही सक्रीय सहभागी व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी या वेळी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी आणि जेजुरीकर ग्रामस्थ आपली गावची धार्मिक यात्रा, उत्सव पालखी परंपरेला पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करत हा वसुंधरा उत्सव साजरा करीत आहेत. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून निसर्गपूजा करण्याकरता काऊदऱ्यात निसर्गमित्र बहुसंख्येने एकवटले होते. जेजुरीची ग्रामदैवत जनाईदेवीची पालखीयात्रा जयद्री ते सह्याद्री असा दीडशे किलोमीटरचा प्रवास करत दाखल झाली होती. निसर्गपूजा झाल्यानंतर झाडे लावा, झाडे जगवा अशी प्रार्थना करण्यात आली.
जेजुरीहून आलेल्या सुहासिनींना साडीचोळी देण्यात आली. महिलांनी फेर धरत निसर्ग गाणीही गायली. भाविकांनी महाप्रसाद घेतल्यानंतर परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. प्लास्टिक संकलन करून पशुधन व वन्यप्राण्यांच्या खाण्यात हे प्लास्टिक येऊ नये म्हणून दक्षता घेत तसा संदेश देण्यात आला. निसर्गपुजेस शेखर बारभाई, गणेश आगलावे, रविंद्र बारभाई, विजय झगडे, गोरख नारकर, शिवाजी कुतवळ, रेखाताई पाटील आदी जेजुरीचे भक्तगण व मणदुरे (ता. पाटण) परिसरातील भाविक उपस्थित होते.