काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जोरदार धडक देत गडाचे बुरूज खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला. रणरणत्या उन्हातही केवळ मोदींना ऐकण्यासाठी सांगलीच्या मैदानावर २ लाखाहून अधिक जनसमुदाय उपस्थित राहिला.  ही बाब निश्चितच ग्रामीण भागाचे अर्थकारण ठरविणाऱ्या ऊस पट्टय़ातील काँग्रेसच्या राजकारणाला विचार करायला लावणारी आहे.  मोदींना ऐकण्यासाठी जमलेल्या तरुणाईचा सळसळता उत्साह पारंपरिक मतदानाला शह देतो की काय अशी स्थिती निर्माण झाली असून चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोहरे पणाला लावण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही.
सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील राजकारण साखर कारखानदारीवर पोसले गेले आहे.  या मुळे साखर उद्योगातील अर्थकारण या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मतदार संघातील राजकारण निश्चित करीत असते. बहुतांश सहकारी संस्था व साखर कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातच आहेत.  सहकारी संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रसदीवर काँग्रेसचे राजकारण गेल्या तीन पिढय़ा चालत आले आहे. याच साखर कारखानदारीवर राष्ट्रवादीचेही राजकारण अवलंबून आहे.  स्थानिक पातळीवरील निवडणुकात एकमेकांना पाण्यात पाहणारी ही मंडळी राष्ट्रीय अथवा राज्य स्तरावर निवडणुकीसाठी एकत्र येतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. हाच विरोधाभास सामान्य मतदारांच्यादृष्टीने वरवरचा अनाकलनीय वाटत असला तरी नवखा मात्र मुळीच नाही.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सामान्य मतदाराला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर काँग्रेसच्या दृष्टीने पुरवून खाण्याचा विषय ठरलेला दुष्काळ नरेंद्र मोदी यांनी ऐरणीवर आणला. २०-२५ किलोमीटरवर दुथडी वाहणारी कृष्णामाई आणि पूर्व भागातील दुष्काळामुळे होरपळणारी भुंडी राने, करपलेली मने यामागे असणारे राजकारण मोदींच्यामुळे राजकीय पटलावर आले.  चार-चार पिढय़ा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या घराण्याला दुष्काळी जनतेच्या समस्या समजत नाहीत असाही भाग नाही, मात्र प्रश्न संपले तर सुबत्ता येईल, परिणामी राजकीय वर्चस्वाला धक्का बसेल ही सुप्त भीती असल्यानेच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास टाळाटाळ झाली.
व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग ठरलेल्या तरुणाईला मोदींची क्रेझ वाटत आहे.  गुळमुळीत उत्तरांपेक्षा ठोस उपाय अपेक्षित आहे.  रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत, औद्योगिकीकरणाचा अभाव, गावाकडे पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीची अवस्था काय, वाढती महागाई या साऱ्याला प्रस्थापितच जबाबदार आहेत, अशी भावना या तरुणाईची झाली आहे. त्यातूनच मोदींच्या आश्वासक सभेकडे हा वर्ग वळला असून तोच आता निर्णायक टप्प्यावर परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
उन्हातील गर्दी
वैशाख वणव्याची आठवण करून देणारे ऊन असताना सांगलीच्या मदानावर २ लाखाचा जनसमुदाय केवळ नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी जमतो. सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच गर्दीचा उच्चांक नोंदविणारी मोंदींची सभा परिवर्तनाची नांदी ठरते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा