मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपातील कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. फटाक्यांची आतषबाजी व साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आजच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकत्रे गुरुवारी मुंबईला रवाना झाले होते. शुक्रवारी सकाळपासून आमदार चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकू लागल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सायंकाळी बिंदू चौकात मोठय़ा पडद्याचा टीव्ही लावून शपथविधीचा सोहळा कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे अनुभवला. आमदार पाटील हे शपथ घेत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला. साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी नेत्रदीपक अत्याकर्षक शोभेच्या दारूचे काम करण्यात आले होते. या वेळी शहर भाजपा उपाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, आशिष कपडेकर, देवेंद्र जोंधळे, मारुती भागोजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच संभाजीनगर येथील आमदार पाटील यांच्या निवासस्थानी नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या आई सरस्वती पाटील यांना पेढे देऊन अभिनंदन करण्यात आले. अंजली पाटील या त्यांच्या सौभाग्यवती शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. त्याशिवाय शाहुपुरी येथील मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, इचलकरंजी येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी उद्यानात शपथविधीचा आनंद साजरा केला. मोठय़ा पडद्यावर शपथविधीचा सोहळा एकत्रितपणे पाहण्यात आला. या वेळी भाजप शहराध्यक्ष विलास रानडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.
चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर जल्लोष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपातील कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
First published on: 01-11-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm in supporters after chandrakant patil taking the oath