सांगली : सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या मोहक अदा, लेसर किरणाचा झगमगाट आणि उडत्या चालीच्या गीतांची साथ यावर तरूणाईचा जोष अशा वातावरणात पार पडलेल्या मिरजेतील दहीहंडी उत्सवात तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाने आठव्या थरावर हंडी फोडून पाच लाखाच्या भाजप-जनसुराज्य पक्षाच्या बक्षिसावर आपले नाव कोरले. शनिवारी रात्री झालेल्या या उत्सवास मिरज शहरासह ग्रामीण भागातून हजारो तरूणांनी आनंद लुटला.
हेही वाचा >>> जव्हार तालुक्यातील सोनू म्हसे यांना मिळाली जी-२० परिषदेनिमित्त घांगळी वादनाची संधी
जनसुराज्यचे युवा नेते समित कदम आणि भाजपचे विधानसभा प्रमुख प्रा. मोहन वनखंडे आदींच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक रकमेच्या दहीहंडीचे आयोजन शनिवारी मिरजेतील कोळेकर मठाच्या खुल्या मैदानात करण्यात आले होते. या दहीहंडीचा प्रारंभ समरादित्य कदम या बालकाच्या हस्ते करण्यात आले.
दहीहंडीसाठी पाच लाख पाच हजार 999 रूपयांचे इनाम जाहीर केल्याने मुंबई, ठाणेसह राज्याच्या विविध भागातून गोपाळांचे संघ सहभागी झाले होते. गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह मीनाक्षी गडेकर, श्रुतिका लोंढे या नृत्यतारकांनीही हजेरी लावली. सोनालीच्या अप्सरा आली या नटरंगमधील लावणीनृत्यावर तरूणाईने ठेका धरत जोष केला.
हेही वाचा >>> “नवनीत राणांनी काळजी करू नये, लोकांचं…”; देवेंद्र फडणवीसांचं अमरावतीत वक्तव्य
यावेळी माजी मंत्री आमदार विनय कोरे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, महापालिकेच्या माजी सभापती अनिता वनखंडे, हेमलता कदम, विश्वगंधा कदम, माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी उत्सवाचा आनंद घेतला.