विश्वास पवार
फलटण : संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण येथे उत्साही स्वागत करण्यात आले. एक दिवसाच्या मुक्कामासाठी येथील शहरालगत असलेल्या प्रशस्त पालखी तळावर विसावला. सापडलेल्या व हरवलेल्या वस्तूंचे निवेदन करण्यात आले. चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरली. त्यानंतर समाज आरती होऊन पालखी माऊलींच्या तंबूत ठेवण्यात आली व दर्शन बारी सुरु झाली.बुधवारी पहाटे तरडगाव पालखी तळावर माऊलींची महापूजा झाल्यानंतर पालखी सोहोळा फलटणकडे मार्गस्थ झाला. श्री दत्त मंदिर काळज येथे सकाळच्या पहिल्या विसाव्यासाठी सोहोळा थांबला दुसरा विसावा सुरवडी येथे खास उभारण्यात आलेल्या दर्शन मंडप ठिकाणी झाला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी उपसभापती विमलताई साळुंखे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सरपंच शरयू साळुंखे पाटील, जितेंद्र साळुंखे पाटील, ग्रामसेवक शिवाजीराव राऊत यांनी स्वागत केले.
दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी सोहोळा निंभोरे ओढा येथे थांबला. दुपारच्या विसाव्यासाठी सोहोळा वडजल येथे थांबला. त्यानंतर सोहोळा फलटणकडे मार्गस्थ झाला. पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे शहराच्या प्रवेशद्वारावर फलटण नगर परीषदेच्यावतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी स्वागत केले. माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सदगुरु हरीबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक श्री राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थाने ट्रस्टच्या वतीने माऊलींसह लाखो भाविकांच्या जनसमुदायाचे स्वागत जिल्हा परीषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी जिल्हा परीषद सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, डॉ. राजवैद्य, देवस्थान ट्रस्टचे मानकरी, सेवेकरी आणि किशोरसिंह नाईक निंबाळकर, प्रगती कापसे वगैरे मान्यवरांनी स्वागत केले. फलटण येथील विमान तळावरील पालखी तळावर पोहोचला चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरली. त्यानंतर समाज आरती झाली. समाज आरतीनंतर पालखी माऊलींच्या तंबूत ठेवण्यात आल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी मोठ्या रांगा लावल्या.पालखी सोहळ्याचे आगमन शहरात सायंकाळी झाले तरी सोहोळा बाहेरील वारकरी व भाविकांचे सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका या मुळे अवघे शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते.
दरम्यान गुरुवार दि. २२ जुलै रोजी फलटण येथून सकाळी ६ वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवुन हा सोहळा सातारा जिल्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी दाखल होणार आहे. शुक्रवार दि. २३ जुलै रोजी हा वैष्णवांचा मेळा दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.