दापोलीत ‘ शिवसेना आपल्या दारी’ची घोषणा
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या बंडखोरीने शिवसेनेला दापोली पंचायत समितीतील सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर तालुक्यात पक्षाची पुनर्बाधणी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याद्वारे नाराज शिवसनिक आणि विस्कळीत झालेल्या पक्षाच्या व्होटबँकेला स्वगृही आणण्याचा प्रयत्न होईलच, पण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे दापोली मतदारसंघातील राजकीय आस्तित्वही संपुष्टात आणण्याच्या हालचाली सुरू होतील.
माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाल्यानंतर एक वर्षांतच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून फोकस करण्यास सुरूवात केली. या धोरणात दळवी विरोधकांना कदम पितापुत्रांनी साथीला घेतल्याने दळवी समर्थकांत मोठी नाराजी निर्माण झाली. त्याचा फटका दापोलीत तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांत बसला. दळवी समर्थकांनी शिवसेनेची व्होटबँक भाजपकडे वळवून रामदास कदम समर्थकांना शह देण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या भांडणात अर्थातच राष्ट्रवादीचा फायदा झाला आणि दापोली पंचायत समितीवर अनपेक्षित सत्तापरिवर्तन झाले.
या निवडणुकीत दळवी समर्थकांचे बळ मिळूनही भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. अर्थात त्यांनी फक्त मतविभाजनाची भूमिका पार पाडल्याचे स्पष्ट झाले.
तसेच दळवी यांच्यामुळे भाजपला फारशी ताकद मिळू शकत नाही, हेदेखील या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. साहजिकच दळवी यांची आता पूर्णपणे राजकीय कोंडी झाली आहे. मुळात या निवडणुकीपूर्वी आणि नंतर सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण त्यांनी याबाबत कोणतीही ठोस पावलं न उचलल्याने सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर रामदास कदम यांनी दापोली तालुक्यात ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेत ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी हाक रामदास कदम तालुक्यातील नाराज शिवसनिक आणि मतदारांना देणार आहेत. साहजिकच या मोहिमेने दळवी समर्थकांना आपल्या राजकीय भूमिकेबाबत समझोता करण्याची संधी मिळणार आहे. त्यातूनच सूर्यकांत दळवी यांचे अंधातरी राजकीय भवितव्य समर्थकांच्या अभावी पूर्णपणे संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे हा उपक्रम जिल्ह्यत फक्त दापोली तालुक्यातच राबवण्यात येणार असून त्यात पर्यावरण मंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमात ८ ते १० एप्रिलदरम्यान तालुक्यातील ५० गावांचा पर्यावरण मंत्र्यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात येणार आहे.
तालुक्यातील उर्वरित सर्व गावेही कालांतराने या उपक्रमात सामील करण्यात येतील. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम समर्थकांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.