राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही छुपा अजेंडा नाही. खास विदर्भावर लक्ष केंद्रित नाही. राज्यातील प्रत्येक भागाचा समान विकास व्हावा, असे पक्षाला वाटते, असे सुस्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पक्षाचा महिला मेळावा आटोपल्यानंतर क्रीडा संकुलात त्या पत्रकारांशी बोलल्या. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
निवडणुकांपूर्वी संघटना बांधणीवर सध्या पक्षाचा जोर आहे. महिला, युवतींचे मेळावे घेण्यासाठी राज्यात दौरा करीत आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात विद्यार्थी मेळावे घेतले जाणार आहेत. विदर्भातही पक्षाची ताकद वाढवायची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येणार काय, पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून आपले नाव घेतले जाते, याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, आपण स्वत: २०१४ मधील निवडणूक लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात अनेक मातब्बर (हाय टॅलेंटेड) नेते आहेत. नेत्यांची कमतरता नाही आणि व्हॅकन्सीही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना वीस वर्षांपूर्वी महिला धोरणाचा सर्वप्रथम पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. महिला धोरणाची अंमलबजावणी होत आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण ही पक्षाची मागणी जुनीच आहे. केंद्र सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमातही त्याचा समावेश आहे. आता त्यात सुधारणा केल्या जात आहेत. सुधारणा सुचविल्या जाणार आहेत. त्याआधी महिला मेळाव्यांद्वारे महिलांची मते जाणून घेतली जातील. नागपुरात स्वत: प्रदेशाध्यक्षांनी सावित्री फुले महिला विद्यापीठाची मागणी केली आहे. त्यासंबंधी पाठपुरावा केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा